
कराड : ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 45 अंतर्गत 81 प्रकारची कामे, शाश्वत विकासाची 17 ध्येय, नऊ संकल्पना पूर्ण करण्यासाठी लोकसभागीय, सर्वसमावेशक आराखड्याप्रमाणे सर्व कामे पूर्ण करून गाव विकास साध्य करण्यासाठी ग्राम विकास समित्या मजबूत केल्या पाहिजेत असे प्रतिपादन यशदाचे आणि पंचायत प्रशिक्षण केंद्राचेप्रवीण प्रशिक्षक विद्याधर गायकवाड यांनी केले.
राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, वर्ये, सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती यांच्या वतीने च्या कराड तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज येथे तीन दिवसीय प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 45 व 49 या विषयावर मार्गदर्शन करताना विद्याधर गायकवाड बोलत होते.
या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन राजमाने यांच्या हस्ते करण्यात आले. तर पंचायतराज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव यांनी पहिल्या दिवशी ग्रामपंचायत अधिनियमातील महत्त्वाची कलमे, ग्रामपंचायत कामकाज, जबाबदारी, कर्तव्य, कामे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.आणि शाश्वत विकासाची ध्येय, नऊ थीम आणि गाव विकास आराखडा यावर अमोल जाधव आदींनी प्रभावी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये वानरवाडी, ओंडोशी, वडगाव हवेली, पश्चिम सुपने, गोंदी, कोरेगाव, दुशेरे, जुळे वाडी, वनवास माची, मांगवाडी, आणे, अरेवाडी, उत्तर तांबवे, तारूख, गणेशवाडी, घराळवाडी, कोयना वसाहत, हनुमंतवाडी, येळगाव, कोयना वसाहत, कासार शिरंबे, मनू, रेठरे खुर्द, आटके, कुसुर, डेळेवाडी, उत्तर कोपर्डे आणि सुपने इत्यादी गावातील नवनिर्वाचित सरपंच ग्रामपंचायत सदस्य या प्रशिक्षण मध्ये सहभागी झाले होते.