
मुंबई : आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन आहे. देशभरात आजच्या दिवशी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. हा दिवस देशभरात भीम अनुयायींसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो.
1956 मध्ये याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. आंबेडकर यांचे निधन झाले. त्यामुळे, या दिवसाला ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हटले जाते. हा दिवस कोलंबिया आणि कॅनडा या देशात ‘आंबेडकर समानता दिवस’ म्हणूनही साजरा केला जातो.
महापरिनिर्वाण दिन निमित्त आंबेडकरी अनुयायींनी दादरच्या चैत्यभूमीवर गर्दी केली आहे. चैत्यभूमीवर अवघा भीमसागर लोटला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी आज मुंबईत आले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही चैत्यभूमीवर जात आंबेडकरांना अभिवादन केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडियावर यासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “सर्वांना माझा आदरपूर्वक जय भीम…बाबासाहेबांनी भारताला कायदे दिले. त्यांचसोबत शिक्षण अर्थव्यवस्था, शेती याचे विचार दिले. बाबासाहेबांनी लिहलेलं ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाला शंभर वर्ष पूर्ण झाली.
आलिकडेच 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला. गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला, ही अभिमानाची बाब आहे. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा वापर देशासाठी केला. त्यांच्या विचारांनी देशाला नवी दिशा दिली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.