भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा..तुरुंगापेक्षा भाजप बरा : शरद पवार

कोल्हापूर : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्याचे मला अजिबातच आश्चर्य वाटले नाही. कारण भाजपने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श प्रकरणात त्यांचे नाव आले होते. त्यामुळे त्यांना धमकावण्यासाठीच तो उल्लेख केला होता. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा..तुरुंगापेक्षा भाजप बरा असे आता लोकच म्हणू लागल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
एकाबाजूला अबकी बार..चारसौ पार ची गॅरंटी दिली जात असतानाच त्याचवेळेला विविध पक्षांचे नेते भाजपमध्ये घेतले जात आहेत. कारण त्यांना लोकसभा निवडणूकीतील यशाबद्दल खात्री वाटत नाही. त्या अस्वस्थेतूनच ते असे करत असल्याची पवार यांनी सांगितले.
शेतीच्या प्रश्र्नांबाबत केंद्र सरकारचे धोरण धरसोडवृत्तीचे असल्याची टीका पवार यांनी केली. ते म्हणाले, कांद्यावरील निर्यातबंदी नुकतीच सरकारने उठवली. कांदा पिकवणारा शेतकरी हा लहान आणि जिरायती शेती करणारा आहे. त्याला चार पैसे मिळायची वेळ येते तेव्हा केंद्राने त्यावर बंदी घातली. इथेनॉल प्रकल्पाची उभारणी केल्यावर त्याच्या उत्पादनावर निर्बंध आणले. सरकार दर पंधरा दिवसांला धोरण बदलत असल्याची टीका पवार यांनी केली.
मुलीला मुख्यमंत्री करण्यासाठी पवार यांची धडपड असल्याची टीका भाजप नेते अमित शहा करतात पण सुप्रिया लोकसभेत काम करते हे त्यांना कदाचित माहित नसावे असा टोला त्यांनी लगावला. बारामती मतदार संघातून चर्चा काहीही असली तरी अजून विरोधकांनी कुणाच्याही नावांची अधिकृत घोषणा केलेली नाही. ती करतील तेव्हा पाहू असे सांगून त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबतच्या प्रश्र्नांला अनुलेख्खाने मारले.