
कराड : चोरीची दुचाकी घेऊन फिरणाºयास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून सांगली जिल्ह्यातून चोरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. कराडातील वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे सांगली जिल्ह्यातील दुचाकी चोरीचा हा गुन्हा उघडकीस आला.
निरंजन सोमनाथ साळुंखे (वय २२, मूळ रा. मासाळ टेक, म्हसवड, ता. माण, सध्या रा. खोडशी, ता. कराड) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराडच्या वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संतोष जगदाळे व कर्मचारी ओंकार शिंदे हे बुधवारी दुपारी बसस्थानक परिसरात कर्तव्य बजावत असताना एक दुचाकी त्यांनी अडवली. संबंधित दुचाकीला नंबरप्लेट नव्हती. त्यामुळे त्यांनी चालक निरंजन साळुंखे याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्राबाबत विचारणा केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्यामुळे वाहतूक पोलिसांनी ती दुचाकी ताब्यात घेतली. तसेच चालक निरंजन साळुंखे यालाही ताब्यात घेण्यात आले.
पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर व वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दुचाकीच्या चेसी व इंजिन क्रमांकावरून परिवहन कार्यालयाकडून माहिती घेतली असता संबंधित दुचाकी भिलवडी स्टेशन येथील संतोष गाडे यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेतली असता ती दुचाकी मे २०२४ मध्ये चोरीस गेली असून भिलवडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयीताला दुचाकीसह भिलवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.