ताज्या बातम्याराजकियराज्य

योग्यवेळी योग्य निर्णय. अजितदादांच्या ‘त्या’ प्रश्नावर जयंत पाटील यांचं सूचक विधान; सभागृहात हशा

मुंबई : राज्याच्या विधानसभेत आज पुन्हा एकदा हशा, खसखस, चिमटे आणि टोमणे ऐकायला मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नाना पटोले, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांना चांगलेच टोले लगावले.

त्यामुळे सभागृहात एकच खसखस पिकली. त्यातच जयंत पाटील यांच्या सूचक विधानाने तर खसखस पिकलीच, पण नव्या चर्चेला वाटही मोकळी करून दिली आहे. त्यामुळे जयंत पाटील हे अजितदादांच्या पक्षात जाणार का? अशी चर्चा आता रंगायला सुरुवात झाली आहे.

विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना चांगलाच हास्यविनोद रंगला. यावेळी विधानसभा अध्यक्षांची किती जरब असते आणि त्यांचा मान कसा सर्वांनी ठेवला पाहिजे, याची माहिती जयंत पाटील देत होते. त्यासाठी त्यांनी 1990चा एक किस्सा सांगितला. मधुकर चौधरी विधानसभा अध्यक्ष होते. 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर अध्यक्ष नाही, आमदार, असं अजितदादा म्हणाले. त्यानंतर जयंत पाटील यांनी तात्काळ सारवासारव करत वाक्य दुरुस्त केलं. पहिल्यांदा मी आमदार झालो. किती लक्ष आहे बघा माझ्यावर, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

जयंत पाटील यांना दादांनीही तात्काळ प्रत्युत्तर दिलं. माझं लक्ष आहे. तुम्ही कधी प्रतिसाद देताय? असा सवाल अजित पवार यांनी केला. त्यावर आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे दादा. योग्यवेळी योग्य निर्णय, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी करताच सभागृहात एकच हस्यकल्लोळ झाला. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मनात काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

त्यावेळी अध्यक्ष उभे राहिले तर विधानसभेचे सदस्य आत येताना तिथेच उभे राहायचे. आता अध्यक्ष उभे राहतात, बोलतात. तरीही सदस्यांची सभागृहात ये-जा सुरू असते. आता तुम्ही कडक व्हा. सर्व सदस्यांना पत्र पाठवा. प्रोटोकॉल पाळायला सांगा. त्यात मीही आलो. खाली बसून बोलण्यापेक्षा बोलणाऱ्याला कमी वेळेत संधी द्या. अमेरिकेत क्लॉक सिस्टिम आहे. पाच मिनिटं झाली की गजर होतो. सदस्य बोलायचे थांबतात. तुम्हीही स्टॉप वॉच ठेवा. सदस्यांना 10 ते 15 मिनिटांचा वेळ द्या. किती काळ चर्चा करायची याला मर्यादा असते. असे काही नवीन नियम गट नेत्यांची बैठक घेऊन कराल अशी आशा आहे, अशी सूचना जयंत पाटील यांनी अध्यक्षांना केली.

यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं कौतुकही केलं. आपण अडीच वर्ष उत्तमपणे काम केलं. सर्व बाजूने बोललं जातं, ते ऐकावं असं मी तिकडे असताना म्हटलं होतं. त्यावेळी वाटायचं अध्यक्षांना डाव्या बाजूला ऐकायला कमी येतं. झिरवळ उपाध्यक्ष झाले. तेव्हा तिकडच्या बाजूला होतो. तेव्हा एका बाजूने कमी ऐका असं मी झिरवळ यांना विनोदाने म्हटलं होतं. पण तुम्ही अडीच वर्षात दोन्ही बाजूने ऐकत होता. तुम्ही संख्याबळावर काही बोट ठेवलं नाही. तोच स्वभाव तुमचा कायम राहिल अशी अपेक्षा आहे, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

आज तिघांची भाषणे झाली. पहिल्या भाषणापेक्षा दुसरं भाषण मुख्यमंत्र्यांचं आहे का असं वाटावं अशी वेळ आली. प्रदीर्घ मार्गदर्शन सभागृहाला झालं. सभागृहात मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. तो कुलाबा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील सर्वात लहान मतदारसंघ आहे. सर्व जाती धर्माचे लोक या सभागृहात राहतात. मच्छिमार या मतदारसंघात राहतात. अतिक्रमण कसं करायचं याचा ‘आदर्श’ याच मतदारसंघात आहे. तुम्ही दुसऱ्यांदा निवडून आला त्याबद्दल अभिनंदन करेल. सलग दुसऱ्यांदा तुम्ही अध्यक्ष झाला. मी तुम्हाला खासगीत सांगायचो परत संधी मिळाली तर मंत्री व्हा. मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो. तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल. पण तो तुमच्या पक्षाचा निर्णय आहे, असं जयंत पाटील यांनी म्हणात एकच खसखस पिकली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close