राज्यसातारा

सातारा जिल्ह्यातील विकास कामे राज्यासाठी रोल मॉडेल : उपमुख्यमंत्री अजित पवार

सातारा जिल्ह्याच्या उत्कृष्ट सादरीकरणासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे केले अभिनंदन

सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2024-25 च्या राज्यस्तरीय बैठकीत पुणे विभागाच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेमध्ये देण्यात येणारा निधी प्राधान्याने सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवर विशेषत: शिक्षण, आरोग्य, पर्यटन, महिला व बाल विकास, कृषी, मृद व जलसंधारण क्षेत्रासाठी उपयोगात आणावा, असे निर्देश श्री. पवार यांनी दिले.
बैठकीला पुणे विभागातील चारही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपसचिव नितीन खेडकर, नियोजन उपायुक्त संजय कोलगणे आदी उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समिती साताराने मंजूर केलेला आराखडा या बैठकीत सादर करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व विकास आराखड्यांचे सादरीकरण अत्यंत उत्कृष्टपणे केल्याबद्दल अभिनंदन करून अभिनंदन करून अजित पवार म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये माझी शाळा आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात येत असून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणणाऱ्या या संकल्पना आहेत . माझी शाळा आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या संकल्पना राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्याबाबत सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सातारा जिल्ह्याने प्रतापगड किल्ला संवर्धनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा, त्यासाठी राज्यस्तरावरून निधी देण्यात येईल. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून इतर कामे करता येतील.  श्रीक्षेत्र महाबळेश्वर साठी 177 कोटींचा आराखडा तयार केला असून त्यामध्ये सुधारणा करण्यात येऊन तो लवकरात लवकर सादर करावा.
इको टुरिझममुळे पर्यटकांची संख्या वाढत असल्याने त्यासाठीदेखील आवश्यक निधी देण्यात येईल, असे श्री.पवार म्हणाले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रत्येक कामाबाबतचे बारकावे, प्रत्यक्षात काम करताना येणाऱ्या अडचणी यावेळी मांडल्या. अंगणवाडी बांधकामासाठी सध्याचा निधी कमी असून त्यामध्ये वाढ कशासाठी आवश्यक आहे याचेही सविस्तर विवेचन जिल्हाधिकारी डुडी यांनी यावेळी केले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंगणवाडी बांधकामाचा दर्जा चांगला असावा यासाठी खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात येईल, असे सांगितले.
सातारा जिल्ह्याने तयार केलेला जिल्हा विकास आराखडा अत्यंत सर्वसमावेशक असून याला रोल मॉडेल मानून सर्व जिल्ह्यांनी सातारा जिल्ह्या प्रमाणेच जिल्हा विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना राज्याला दिल्याचे ही श्री अजित पवार यांनी सांगितले.
सन 2023-24 च्यावार्षिक योजनेच्या खर्चाच्या बाबतीत जवळपास शंभर टक्के प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या आहेत.  तसेच 80 टक्के खर्च झाला आहे. संपूर्ण राज्यात सातारा जिल्हा यामध्ये प्रथम क्रमांकावर असल्याबद्दलही श्री. अजित पवार यांनी यावेळी प्रशंसा केली.
सातारा जिल्ह्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामांचा दर्जा व गुणवत्ता उच्च रहावी, यासाठी वर्क क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम तयार केलेली आहे, ही सिस्टीम अत्यंत चांगली असून कामाच्या दर्जात अमुलाग्र बदल घडवणारी आहे. यासाठीही श्री पवार यांनी या बैठकीत कौतुक केले.
प्रधान सचिव सौरभ विजय यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या.

या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, आदी उपस्थित होते.

रोजगार निर्मितीवर भर द्या
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या जिल्ह्यात औद्योगिक विकास, कौशल्य विकास आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर द्यावा. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजार मिळवून देण्याचे प्रयत्न व्हावेत. सर्व कामे दर्जेदार होतील याकडे विशेष लक्ष द्यावे. कामांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड करु नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close