मनोज जरांगे यांच्याशी कधीही शरद पवार साहेबांचा संपर्क आलेला नाही : जयंत पाटील

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची नवी दिशा काय असेल हे स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने शिक्षण आणि नोकरीत स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असला तरी मनोज जरांगे आंदोलनावर ठाम आहेत. मात्र, आता मराठा आंदोलकांमध्ये फूट पडल्याचे चित्र असल्याची चर्चा आहे. यातच या आंदोलनामागे शरद पवार असल्याचा दावा करण्यात आला होता. याला जयंत पाटील यांनी उत्तर दिले.
आंदोलनात सहभागी असलेल्या अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर घणाघाती टीका करत गंभीर आरोप केले. यानंतर संगीता वानखेडे या महिला आंदोलकाने मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवारांचा हात या आंदोलनामागे आहे. मनोज जरांगेंच्या सगळ्या आंदोलनांचा खर्च शरद पवारांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील शरद पवार सांगतात तसेच ऐकतात, असा मोठा दावा संगीता वानखेडे यांनी केला आहे. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, मनोज जरांगे यांच्याशी कधीही शरद पवार साहेबांचा संपर्क आलेला नाही, त्यांचा संपर्क कोणाशी आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती असावे असा माझा अंदाज आहे. मुख्यमंत्री व मनोज जरांगे पाटील यांच्या संवादात कशामुळे विसंवाद तयार होतो? याचा अभ्यास करून सरकारने अशी आंदोलने वारंवार होणार नाहीत याची जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्राला मनोज जरांगेंनी वेड्यात काढले आहे. मनोज जरांगे पाटील कोण हे आधी कुणाला एवढे माहिती नव्हते. लाठीचार्ज झाल्यानंतर त्यांना डोक्यावर घेतले. डॉ. प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सगळे त्यांना भेटले. त्यानंतर मनोज जरांगेंना लोकांनी डोक्यावर घेतले. त्यामुळेच त्यांच्याशी जोडले होते. मनोज जरांगे साधासुधा माणूस, आपल्या भाषेत बोलणारा माणूस म्हणून महाराष्ट्राने विश्वास ठेवला होता. एक महिन्यापूर्वीपर्यंत त्यांच्यासह होते. पण आता त्यांच्यासोबत नाही, या शब्दांत संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगेंवर निशाणा साधला.