
कराड : बंब चोरीप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन अटक केले. त्याच्याकडून सुमारे ३० हजार रुपयांचे बंब जप्त करण्यात आले. कराड शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
आरिफ अब्दुलखालिक शेख (वय ३५, रा. अमर टॉकीजसमोर, खाजा झोपडपट्टी, मिरज) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोडशी येथील संग्राम शांताराम लोंढे यांच्या घरासमोरून पितळी धातूचा पाणी तापविण्याचा बंब रविवारी, दि. २८ सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास चोरीस गेला. त्यानंतर संग्राम लोंढे यांनी परिसरात चौकशी केली असता गावातील नारायण कृष्णा पाटील, रामचंद्र शिवाजी जंगम, ओमकार काटकर, वर्षा राजाराम सावंत यांचाही प्रत्येकी एक असे एकूण पाच बंब चोरीला गेल्याचे लोंढे यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
याबाबतचा तपास सुरू असताना आरिफ शेख हा दुचाकीवरून पाण्याचे बंब घेऊन जाताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचे तीन बंब हस्तगत केले. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. सहाय्यक फौजदार सुभाष फडतरे तपास करीत आहेत.
…