
कराड : बंद घराचे कुलूप तोडून घरात घुसलेल्या चोरट्यांनी पाच तोळ्याचे दागिने आणि एक लाखाची रोकड असा सुमारे तीन लाखाचा ऐवज लंपास केला. बनवडी, ता. कराड येथील जाधव पार्क रो हाऊसमध्ये ही घटना घडली.
याबाबत प्रतिमा सुनील यादव यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनवडी येथील जाधव पार्क रो हाऊसमध्ये प्रतिमा यादव या कुटुंबासह राहण्यास आहेत. २९ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास प्रतिमा यादव या कुटूंबासह कामानिमित्त पुण्याला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या कपाटात पाच तोळ्याचे गंठण आणि एक लाखाची रोकड ठेवली होती. संबंधित कपाटाला त्यांनी कुलूप लावले नव्हते. त्यानंतर तीन दिवस प्रतिमा या पुण्यातच वास्तव्यास होत्या. दरम्यान, २ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांना त्यांच्या शेजाऱ्यानी फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रतिमा यांनी शेजाऱ्याना घरात जाऊन पाहण्यास सांगितले. घरात चोरी झाल्याचा संशय आल्यामुळे प्रतिमा यादव या तातडीने कराडला निघून आल्या. त्यांनी बनवडी येथे घरात जाऊन पाहिले असता कपाटातील तिजोरीचा कप्पा विस्कटलेला दिसून आला. त्यामधील एक लाखाची रोकड आणि दोन लाखाचे पाच तोळे वजनाचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांना दिसले.
याबाबत त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहेत.