जेव्हा जेव्हा लोकशाही मूल्यांची चर्चा होईल, तेव्हा मनमोहन सिंग यांची आठवण येईल : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या निरोप समारंभावेळी सभागृहाला संबोधित केले. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं योगदान आणि कार्याचा गौरव केला. जेव्हा जेव्हा लोकशाही मूल्यांची चर्चा होईल, तेव्हा मनमोहन सिंग यांची आठवण येईल. आम्हाला सिंग यांचं मार्गदर्शन लाभलं आहे. मनमोहन सिंग हे दक्ष खासदाराचं उत्तम उदाहरण आहेत, असंही मोदी म्हणाले.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा सातवा दिवस आहे. राज्यसभेतील ५६ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यांच्या निरोप समारंभावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपले विचार मांडले. मोदींनी यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांचा विशेष उल्लेख केला.
मोदी म्हणाले की, ‘दर दोन वर्षांनी या सभागृहात अशा प्रकारचा प्रसंग येतो. मात्र, हे सभागृह निरंतरतेचं प्रतीक आहे. लोकसभा पाच वर्षांनंतर नव्या रंगरूपानं सजते. हे सभागृह दर दोन वर्षांनी नवी प्राणशक्ती, नवी ऊर्जा प्राप्त करते. उत्साहाचं वातावरण भरलं जातं. त्यामुळंच दर दोन वर्षांनी होणारा निरोप समारंभ हा निरोप नसतोच. बऱ्याच स्मृती ठेवून जातात. ती येणाऱ्या नव्या सदस्यांसाठी एक प्रकारची अमूल्य देण असते.’
मनमोहन सिंग यांचे या सभागृहासाठी विशेष योगदान आहे. लोकशाही मूल्यांची जेव्हा चर्चा होईल, त्या-त्या वेळी मनमोहन सिंग यांची आठवण येत राहील. ते सहा वेळा या सभागृहाचे सदस्य राहिले. वैचारिक मतभेद होते; परंतु, त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी या सभागृहाला मार्गदर्शन केले. जेव्हा खासदारांच्या योगदानाची चर्चा होईल तेव्हा मनमोहन सिंग यांचीही चर्चा होईल, असे गौरवोद्गार मोदी यांनी काढले.
मनमोहन सिंग व्हिलचेअरवर आले आणि त्यांनी मतदान केले होते. लोकशाहीला बळ देण्यासाठी ते आले होते. आम्हाला मार्गदर्शन करावं अशी त्यांना खासकरून विनंती आहे, असेही ते म्हणाले.
त्या कालखंडाने आम्हाला खूप काही शिकवलं. कधी-कधी फॅशन परेडचं दृश्यही बघायला मिळालं. काळ्या कपड्यांमध्ये सभागृहात खासदारांची फॅशन परेड बघायला मिळाली. जेव्हा कोणतं चांगलं काम होतं, त्यावेळी काळं तीट लावतात. खरगेंना या वयात हे काम चांगलं शोभून दिसतं, असा टोलाही त्यांनी लगावला.
ज्यांचा कार्यकाळ संपणार आहे, ते खासदार जुन्या आणि नव्या संसद भवनाच्या आठवणींची शिदोरी घेऊन जात आहेत. कोविडच्या काळात कोणत्याही खासदाराने देशाचं काम थांबवलं नाही. सभागृहात येऊन चर्चा केली आणि कोविडच्या काळात देशाची सेवा केली. किती मोठी जोखीम त्यांनी घेतली हे देशाला माहीत झालं, असेही गौरवोद्गार त्यांनी काढले.