
कराड : देशी दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. मलकापूर येथील बैलबाजार मार्गावर उपअधीक्षक कार्यालयाच्या पोलीस पथकाने मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली.
रवींद्र संजय पवार (वय ३६, रा. गुरुवार पेठ, कराड) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराडातून मलकापूरकडे जाणाऱ्या बैल बाजार रोडवरून देशी दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस नाईक सागर बर्गे, हवालदार पवार आणि पोलीस नाईक कोळी यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
पोलिसांनी मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बैलबाजार मार्गावर असलेल्या गणपती मंदिरानजीक सापळा रचला. त्यावेळी कराडातून मलकापूरकडे निघालेली व्हॅन (क्र. एमएच ०५ एच ३३१४) पोलिसांनी अडवली. संबंधित व्हॅनची झडती घेतली असता व्हॅनमध्ये २४ हजार रुपये किमतीच्या देशी दारूच्या ४८० बाटल्या आढळून आल्या. पोलीस पथकाने दारूच्या बाटल्या तसेच गुन्ह्यात वापरलेली व्हॅन जप्त केली. तसेच आरोपी रवींद्र पवार याला ताब्यात घेतले. पोलीस नाईक सागर बर्गे यांनी याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.