राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रात

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा अखेरच्या टप्प्यात आहे. या यात्रेच्या यात्रेचा समारोपास काहीच दिवस शिल्लक आहेत. 17 मार्चला मुंबईत या यात्रेचा समारोप होणार आहे.
मणिपूर येथून 14 जानेवारीला सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रा मुंबई संपणार आहे. त्याआधी ही यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्याच्या मागणीसाठी राज्याच्या डीजीपींची भेट घेतली. पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड यांनी सोमवारी डीजीपी रश्मी शुक्ला यांची भेट घेतली.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा आज नंदुरबार येथून महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेसंदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, 12 ते 17 मार्च दरम्यान चालणाऱ्या महाराष्ट्रातील भारत जोडो न्याय यात्रेचा हा शेवटचा टप्पा असेल. ही यात्रा धुळे, नाशिक पालघर आणि ठाणे असा प्रवास करून मुंबईत दाखल होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा 13 मार्चला धुळ्यात, 14 मार्चला नाशिक, 15 मार्चला पालघर आणि ठाणे आणि त्यानंतर 16 मार्चला मुंबईत दाखल होईल. त्यानंतर 17 मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर राहुल गांधी यांची यात्रेच्या समाप्तीची जाहीर सभा होणार आहे. राहुल गांधी याच्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसने जय्यत तयारी सुरू केली आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी महाविकास आघाडीच्या पक्षांनाही निमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. याबाबत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील जनता राहुल गांधींच्या स्वागतासाठी सज्ज आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी महाविकासआघाडीच्या सर्व पक्षांच्या नेत्यांना निमंत्रिण देण्यात येणार आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. लवकरच इतर नेत्यांनाही आमंत्रित केले जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. यासाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी पत्रातील नेत्यांसह शिवाजी पार्कच्या मैदानाला भेट दिली आणि तयारीचा आढावा घेतला. शिवाजी पार्कवर यात्रेच्या समारोपाची सभा होणार असून राहुल गांधी यांच्या जाहीर सभेने राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. या यात्रेत इंडिया आघाडीतील प्रमुख नेते सहभाही होणार असल्याचे सांगितले जात आहे.