
कराड : कराड तालुक्यातील रा. मा. १४८ रेठरे खुर्द–आटके–पाचवड–कटपानमळा–गोळेश्वर–कार्वे नाका या महत्त्वाच्या मार्गावरील प्रजीमा ८१ अंतर्गत कि.मी. ५/०० ते १०/०० या टप्प्यातील कटपानमळा ते गोळेश्वर रस्त्यासाठी शासनाने तब्बल ३ कोटी ५० लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देत ग्रामीण भागातील दळणवळण सुधारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मात्र प्रत्यक्षात कामाच्या अंमलबजावणीत होत असलेला विलंब आणि अनियमिततेचे चित्र समोर येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर रस्त्याचे काम ज्या ठिकाणापासून मंजूर झाले आहे त्या प्रारंभ बिंदूपासून कामाची सुरुवात न करता कंत्राटदाराने कामाची दिशा बदलल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. शासनाच्या मंजुरीतील तांत्रिक नकाशा, प्रशासकीय मान्यता आणि प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी यामध्ये तफावत दिसून येत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कामाची अंमलबजावणी नियमबाह्य पद्धतीने होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कटपानमळा परिसरात पूर्वी अस्तित्वात असलेला डांबरी रस्ता नवीन रस्ता करण्याच्या नावाखाली पूर्णपणे उकरून टाकण्यात आला आहे. मात्र तो उकरलेला रस्ता दीर्घकाळ अपूर्ण अवस्थेतच सोडण्यात आल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पावसाळ्यात चिखल आणि उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य निर्माण होत असल्याने ग्रामस्थांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमांनुसार रस्त्याचे काम सुरू करताना पर्यायी मार्ग, सुरक्षाव्यवस्था आणि वेळमर्यादेचे पालन करणे कंत्राटदारासाठी बंधनकारक असते. मात्र या ठिकाणी त्या नियमांचे पालन झाले आहे का, याबाबत शंका निर्माण होत आहे. रस्ता उकरून दीर्घकाळ अपूर्ण ठेवणे हे सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीनेही गंभीर बाब मानली जात आहे.
या कामासाठी शासनाकडून मंजूर झालेला निधी आणि त्याच्या बदल्यात अपेक्षित असलेली दर्जेदार कामगिरी यामध्ये स्पष्ट विसंगती दिसत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. शासनाने दिलेल्या निधीचा योग्य वापर होत आहे का, तसेच कामाच्या दर्जावर संबंधित यंत्रणांकडून प्रभावी देखरेख आहे का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
मंजूर ठिकाणापासून कामाची सुरुवात न करणे, आधीचा रस्ता उकरून तो दीर्घकाळ अपूर्ण ठेवणे आणि कामाच्या प्रगतीबाबत कोणतीही स्पष्ट माहिती न देणे या सर्व बाबींमुळे कंत्राटदाराच्या कार्यपद्धतीवर संशयाची छाया निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करून कामाच्या विलंबास जबाबदार असलेल्या घटकांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
ग्रामीण भागातील विकासाच्या दृष्टीने हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे हा रस्ता वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे गरजेचे असताना सध्या दिसत असलेली उदासीनता ही जनतेच्या विश्वासाला धक्का देणारी ठरत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कामाचा वेग वाढवावा आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
पुढील भागात – अधिकारी व कॉन्ट्रॅक्टदार यांचे कापिल मधील रस्त्यामध्ये व पाईपलाईन मध्ये साठे लोटे आहे..?



