पेट्रोल डिझेलच्या दरात आणखी कपात होण्याची शक्यता
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच वक्तव्य

नवी दिल्ली : नुकतीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
याबाबत पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बाजारातील परिस्थिती पाहून सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट करण्यासंदर्भात निर्णय घेतील असं वक्तव्य मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केलं आहे.
लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मोदी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. निवडणुकीपुर्वी सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारकडून गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे प्रत्येकी दोन रुपयांची कपात करण्यात आली होती. नवीन दर कालपासून म्हणजे 15 मार्चपासून लागू झाले आहेत. दरम्यान, 2022 नंतर प्रथमच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे.
तेलं कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नफा मिळवला आहे. तिसऱ्या तिमाहीत चांगली कामगिरीकेल्यानंतर चौथ्या तिमाहीत देखील कंपन्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तेल कंपन्यांनी 69 हजार कोटी रुपयांचा नफा मिळवल्याची माहिती मंत्री पुरी यांनी दिली आहे. तर संपूर्ण वर्षभरात कंपन्यांचा नफा हा 85 ते 90 हजार कोटी रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता मंत्री पुरी यांनी व्यक्त केलीय. तर चौथ्या तिमाहीत कंपन्याचा नफा 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा असण्याची शक्यता आहे.