भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील कारवाईमुळे विरोधक बिथरलेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ”भ्रष्टाचारी लोक तुरुंगात बंद आहेत, त्यांना सर्वोच्च न्यायालयात देखील जामीन देण्यास तयार नाही. मोठमोठे भ्रष्टाचारी नेते न्यायालयांत खेटे घालत आहेत,” असा टोला मारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भ्रष्टाचाऱ्यांवर यापुढेही कारवाई होतच राहणार, असा इशाराही आज दिला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये मोदी यांनी भाजपच्या प्रचारमोहिमेला सुरुवात केली, त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले,”भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील कारवाईमुळे विरोधक बिथरले आहेत, मात्र आम्ही थांबणार नाही. भ्रष्टाचारी लोकांवरील कारवाई यापुढेही चालू राहील. भ्रष्टाचारी लोकांना वाचविण्यासाठीच ‘इंडिया’ आघाडी तयार झाली आहे. मात्र, गरिबांचा पैसा कोणी हडप करू नये, यावर आमचे लक्ष आहे. देशात अनेक ठिकाणी बिछान्याच्या खालून पैसा निघत आहे. कुठे भिंतीतून नोटा बाहेर येत आहेत. अलिकडेच वॉशिंग मशिनमधून नोटा बाहेर आल्याचे आपण पाहिले. मागील काही काळात दहा कोटी अपात्र लोकांची नावे सरकारी कागदपत्रांमधून हटवण्यात आली. यामुळे देशाचे पावणे तीन लाख कोटी रुपये चुकीच्या लोकांपर्यंत जाण्यापासून वाचले. ‘भ्रष्टाचार हटवा’ हा माझा मंत्र आहे, तर ते ‘भ्रष्टाचारी बचाव’ असे म्हणतात.” लोकसभा निवडणुकीत दोन गट आहेत. एक गट भ्रष्टाचार मिटविण्यासाठी मैदानात आहे, तर दुसरा भ्रष्टाचाऱ्यांना वाचवण्यासाठी मैदानात उतरला आहे. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, असे आवाहनही मोदींनी यावेळी केले.
इंडिया आघाडीमुळे मोदी घाबरेल, असे त्यांना वाटते. मात्र माझ्यासाठी भारत हेच कुटुंब आहे. काँग्रेस सरकारच्या काळात गरीब गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये हडप करण्यात आले. त्या भ्रष्टाचाऱ्यांची संपत्ती जप्त करून गरिबांना त्यांचे १७ हजार कोटी रुपये परत करण्यात आले. मोदी थांबणार नाही, हे भ्रष्टाचारी लोकांनी ध्यानात ठेवावे.
पंतप्रधान मोदी म्हणाले,”विरोधी पक्षांच्या सरकारांच्या चुका देश आजही भोगत आहे. भारताचे मच्छीमार मासे पकडण्यासाठी समुद्रात जातात, तेव्हा त्यांना अटक केली जाते. त्यांच्या बोटी जप्त केल्या जातात. काँग्रेसने केलेल्या पापाचे हे परिणाम आहेत. इंडिया आघाडीचे लोक मच्छीमारांच्याच नव्हे तर युवक आणि शेतकऱ्यांच्या हिताचाही विचार करू शकत नाहीत. शेतकऱ्यांचा तिरस्कार करणाऱ्या इंडिया आघाडीने माजी पंतप्रधान स्व. चौधरी चरणसिंह यांचा कधीही सन्मान केला नाही.”