
कराड : येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळ शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटीत एका बंगल्याच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी सोन्या-चांदीसह हिऱ्याचे तब्बल ३८ लाखाचे दागिने लंपास केले. याबाबत नरेंद्र वसंतराव जानुगडे यांनी मंगळवारी रात्री कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमनजीक शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटी आहे. या सोसायटीत नरेंद्र जानुगडे हे त्यांच्या कुटुंबासह बंगल्यात वास्तव्यास आहेत. ३० मार्चपासून १ एप्रिलच्या रात्रीपर्यंत जानुगडे कुटुंबीय बंगळूर येथे कामानिमित्त गेले होते. बंगल्यातून बाहेर पडताना त्यांनी बंगल्याला कुलूप लावून सर्व दरवाजे, खिडक्या बंद केल्या होत्या. सोमवारी रात्री हे कुटुंबीय बंगळूरहून कराडात आले. त्यावेळी बंगल्याचा दरवाजा कटविण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच दरवाजाशेजारी असलेली खिडकी उचकटण्यात आली होती. खिडकीचे दोन गज कापण्यात आले होते. घरात चोरी झाल्याचा संशय आल्यामुळे कुटुंबीय तातडीने घरामध्ये गेले. त्यावेळी बेडरूमचा दरवाजा तोडलेला दिसला. तसेच बेडरूममधील वॉर्डरोबमध्ये असलेले सोन्याचे, हिºयाचे आणि चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे नरेंद्र जानुगडे यांच्या निदर्शनास आले.
नरेंद्र जानुगडे यांच्या बंगल्यातून चोरट्यांनी २४ हजार रुपयांचे सोन्याचे पेंडंट, २८ हजाराच्या मंगळसूत्र वाट्या, ४८ हजाराचे मंगळसूत्र, २ लाख ६० हजार रुपये किंमतीची पाच मिनी मंगळसुत्र, १ लाख ५२ हजार रुपये किंमतीचे मोठे मंगळसूत्र, १४ हजाराचे कानातील टॉप्स, २० हजाराचे कानातील टॉप्स, दहा हजाराचा चांदीचा करंडा, ५ हजाराची समई, ५ हजाराची जोडवी, झुमके, पैंजण यासह सोन्याचे, चांदीचे व हिºयाचे दागिने चोरीस गेले आहेत.
याबाबत जानुगडे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याठिकाणी भेट दिली. ठसेतज्ञ तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने रस्त्यापर्यंत माग काढला. त्यानंतर श्वान घुटमळले. जानुगडे यांच्या बंगल्यातून सोने, चांदी व हिऱ्याचे ३७ लाख ९४ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरीस गेले असल्याचे पोलिसांनी सांगीतले. तसेच चोरट्यांनी घरातील महत्त्वाची कागदपत्रे आणि वायफायचा राऊटरही लंपास केला आहे. याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक देवकर तपास करीत आहेत.