
कराड : सैदापूर, ता. कराड येथील शेतकरी धनाजी किसन जाधव यांच्या तीन म्हैशींचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. बनवडी फाटा नजिक असणाऱ्या पडीक जागेत शेतकरी धनाजी जाधव यांनी त्यांच्या म्हैशी चरण्यासाठी सोडल्या होत्या. त्यावेळी विजेचा धक्का लागून तीन म्हैशींचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच शेतकरी जाधव यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली जात आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, मंगळवारी. दि. 7 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शेतकरी धनाजी किसन जाधव यांच्या तीन म्हैंशी चरण्यासाठी बनवडी फाटा नजीक असणाऱ्या पाणकणसातत न्हेल्या होत्या. त्यावेळी विजेच्या तारांना म्हैंशीचा धक्का लागताच त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला. यामध्ये तिन्ही म्हैंशीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर बनवडीचे तलाठी आर. एन. अस्वले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. यामध्ये शेतकरी धनाजी जाधव यांचे 3 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पंचनामा करताना वीज वितरण कंपनीचे अधिकारी आशिष यादव उपस्थित होते. बाधीत शेतकऱ्याला शक्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे श्री. यादव यांनी सांगितले. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात झाली नव्हती.