
कराड : शास्त्रीनगर, मलकापूर (ता.कराड) येथील कै. क्रांतीवीर माधवराव जाधव बालगृहातील दोन अल्पवयीन मुलांना अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी कराड शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश सुभाष केंद्रे (वय 14 मुळ रा. सोनगाव, कुडाळ, ता.जवली सध्या रा. बालगृह मलकापूर) व रंजित भिमा चव्हाण (वय 17 मुळ रा. शिरवळ ता.खंडाळा सध्या रा. बालगृह मलकापूर) अशी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलांची नावे आहेत. याबाबत बालगृहाचे काळजीवाहक विठ्ठल लोहार यांनी तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा बालकल्याण समितीच्या माध्यमातून 15 जून 2023 रोजी सिद्धेश केंद्रे व 10 आक्टोबर 2023 रोजी रंजित चव्हाण हि दोन मुले कै. क्रांतीवीर माधवराव जाधव बालगृहात हस्तांतरीत करण्यात आली होती. शनिवारी रात्री जेवण व मनोरंजन झाल्यानंतर संस्थेच्या नियमाप्रमाणे रात्री 10 वाजता सर्व मुलांना दिवा बंद करूण हॉलमध्ये झोपण्यासाठी नेण्यात आले. एका हॉलमध्ये मोठी 21 मुले व दुसऱ्या हॉलमध्ये लहान 9 मुलांना झोपवण्यात आले.
रविवारी सकाळी 6 वाजता नेहमिप्रमाणे सर्व मुलांना आंघोळीसाठी उठवत असताना मोठया मुलांच्या हॉलमधिल सिद्धेश केंद्रे व रंजित चव्हाण हि दोन मुले हॉलमध्ये नसल्याचे निदर्शनास आले. बालगृहात शोध घेतल्यानंतरही दोन्ही मुले मिळून न आल्याने शहर पोलिस स्टेशन मध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.