
पाटण : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या मंत्रिपदाचे वैभव, सुख यांचा उपभोग दुर्दैवाने ताईसाहेबांना फार काळ घेता आला नाही. मात्र देसाई कुटुंबावर चांगले संस्कार करून या कुटुंबाला नवी दिशा देण्याचे खऱ्या अर्थाने पुण्याईचे काम त्यांनी केले. असे भावनिक उद्गार राज्याचे उतपादन शुल्कमंत्री तथा सातारा आणि ठाण्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले. ते “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक दौलतनगर, ता.पाटण येथे लोकनेते यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई यांच्या ६५ व्या पुण्यतिथी कार्यक्रम आणि महिला पदाधिकारी मेळावा व विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम अशा संयुक्त कार्यक्रमात करताना बोलत होते.यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब सहकारी साखर देसाई कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, महाराष्ट्र राज्य दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मछिंद्र सकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जयवंतराव शेलार, दिलीपराव चव्हाण, अशोकराव पाटील, मिलिंद पाटील, विजय पवार, संजय देशमुख, बाळासाहेब पाटील, विलास गोडांबे, पंजाबराव देसाई, आर.बि.पवार, दिपाली पाटील, श्रीमती जयश्री पवार, सौ. वैशाली शिंदे, तसेच पाटण विधानसभा मतदार संघातील विविध संस्थाचे महिला पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री ना.देसाई म्हणाले, महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि राज्याचे माजी गृहमंत्री लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचा पुण्यतिथी कार्यक्रम लोकनेत्यांच्या जन्म शताब्दी वर्षापासून साजरा केला जात आहे.प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त पाटण विधानसभा मतदारसंघातील गरीब कुटुंबातील गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेणेकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांचे नावाने सुरु असलेल्या शिष्यवृत्तीचे वितरण करताना आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान वाटत आहे.
पाटण तालुक्याचा चौफेर विकास आणि प्रगती ही लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी त्याकाळी केलेल्या मूलभूत सुविधांच्या विकासामुळे आहे. त्यामुळे तालुक्याचा विकास हा लोकनेत्यांनी रचलेला पाया असल्याचे सांगून कोणत्याही यशस्वी पुरुषांच्या मागे कर्तबगार स्त्रीचा हातभार असतो त्याचप्रमाणे लोकनेते कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे गेले.मात्र लोकनेत्यांच्या मंत्रिपदाचे वैभव, सुख, मानसन्मान त्यांना दुर्दैवाने फार काळ उपभोगता आले नाही. देसाई घराण्यातील मुलांवर चांगले संस्कार करून देसाई कुटुंबाला दिशा देण्याची महान पुण्याई ताईसाहेबांनी केली.दुर्दैवाने लोकनेत्यांना ही त्यांची साथ फार काळ लाभली नाही. असे स्पष्ट करून पाटण विधानसभा मतदारसंघातील गरीब आणि गरजू कुटुंबातील मुलींना शिक्षणाकरीता हातभार लागावा याकरीता होतकरू विद्यार्थिनींनी वत्सलादेवी देसाई शिष्यवृत्ती चा लाभ घेऊन आपली आपली शैक्षणिक प्रगती कायम उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करून महाराष्ट्र दौलत या लोकनेत्यांच्या शताब्दी स्मारकात मोफत असलेल्या अत्याधुनिक स्टडी सेंटर चा लाभ घ्यावा असे ही आवाहन त्यांनी केले. पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला पदाधिकारी यांनी चूल आणि मूल ही संकल्पना आता बाजूला करुन आपल्या गावाच्या व समाजाच्या प्रगतीसाठी पुरुषांच्याप्रमाणे खांद्याला खांदा देऊन काम करण्याची खरी गरज आहे. त्याबरोबर महिलांचे संघटनही वाढण्याचे काम आता या महिलांनी हाती घ्यावे जेणेकरुन शासनाच्या विविध योजना गावा-गावातील गरजू महिलांपर्यंत पोहचविण्याचे काम सुलभ होईल असे सांगत ते पुढे म्हणाले की, जिजाऊ महिला ट्रस्टच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयं रोजगारासाठी व शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासंदर्भात लवकरच एक आराखडा तयार करण्यात येणार असून लवकरच पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व महिलांचा एक भव्य महिला मेळावा घेणार असल्याचे ही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
पाटण विधानसभा मतदारसंघातील महिलांची संघटना मजबूत.
कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज दौलतनगर ता.पाटण येथे महिला पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी पाटण विधानसभा मतदारसंघातील महिला सरपंच, उपसरपंच, सदस्या तसेच सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालिका यांना निमंत्रित करण्यात आले होते. या महिला पदाधिकारी मेळाव्याला सर्व महिला पदाधिकारी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती. दरम्यान ना. शंभूराज देसाई यांनी भाषणामध्ये याचा उल्लेख करत केवळ एका निरोपावर या एवढया मोठया प्रमाणांत महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. त्यामुळे आजही पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये महिला पदाधिकारी यांची संघटना मजबूत असल्याचे स्पष्ट केले.
शिष्यवृत्तीसाठी ३१ लाख ३१ हजार रुपयांचे वितरण
पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू मुलींना दहावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच्या नावाने शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. यंदाचे हे १४ वे वर्ष असून आतापर्यंत पाटण विधानसभा मतदारसंघातील २०९ मुलींना प्रत्येकी ५५०० रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही १६ मुलींना प्रत्येकी ६०५० रुपयेप्रमाणे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्तीचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले.आज पर्यंत शिष्यवृत्ती साठी म्हणून ३१ लाख ३१ हजार ५०० रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहिती मंत्री देसाई यांनी दिली.
कार्यक्रमात प्रा. मच्छीन्द्र सकटे, श्वेता वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग नलवडे यांनी केले तर आभार बबनराव शिंदे यांनी मानले.