
कराड ः उत्तर पार्ले, ता. कराड येथे जुन्या भांडणाच्या कारणावरुन सहाजणांनी एकाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच जीपच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शितल नितीन गरवरे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
सागर सदाशिव नलवडे, संचित शिवाजी कदम, विश्वजीत शिवाजी कदम, अभिषेक रविंद्र कदम, अजिंक्य राजेंद्र कदम, सुनिल तारासिंग चव्हाण (सर्वजण रा. उत्तर पार्ले, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर पार्ले येथील नितीन गरवरे हे गुरूवारी रात्री घराबाहेर झोपले होते. तर त्यांचे भाऊ, आई, वडील, पत्नी, मुले यांच्यासह सर्व कुटूंबिय घरात झोपले होते. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कुटूंबियांना मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे कुटूंबिय घराबाहेर आले असता संशयीत आरोपी हे पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरुन नितीन गरवरे यांना मारहाण करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नितीन यांचे भाऊ भांडणे सोडविण्यासाठी गेले असताना संशयीतांनी त्यांनाही मारहाण केली. तसेच घराबाहेर पार्क केलेल्या जीपची तोडफोड केली. याबाबत शितल गरवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.