
सातारा : इव्हीएम मशिन हॅक करता येत असल्याने या मशिन्सवर लाेकांचा विश्वास राहिलेला नाही. आगामी निवडणुका इव्हीएम मशिनवर न घेता मतपत्रिकांवरच घ्याव्यात, अशी मागणी येथील इव्हीएम हटाव कृती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.
इव्हीएम मशिनला विरोध दर्शवण्यासाठी दि. २२ जानेवारी रोजी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी इव्हीएम मशिनची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील परिवर्तनवादी संघटनांच्यावतीने इव्हीएम मशिनला विरोध दर्शवत आंदोलनाची हाक देण्यात आल्याबाबतची माहिती माजी आमदार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भीमशक्ती संघटनेचे बाळासाहेब शिरसाट, ॲड. वर्षा देशपांडे, ओबीसी संघटनेचे भरत लाेकरे, विजय मांडके, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे आदी उपस्थित होते. लक्ष्मण माने म्हणाले, ‘सुप्रिम कोर्टाचे ज्येष्ठ वकील भानुप्रतापसिंग आणि त्यांच्या सहकारी वकिलांनी गेली चार दिवस जंतरमंतरवर इव्हीएम आणि व्हीव्ही पॅट मशिन हॅक करता येते हे देशाला व जगाला सिध्द करुन दाखवले आहे. कुठलेही बटण दाबले तरी मत कमळावरच जात असल्याचे यावरुन दिसून येते. त्यामुळे कोट्यवधी मतदारांच्या मतांची चोरी होत आहे. आज भारताची लाेकशाही व संविधान धोक्यात असून केंद्र सरकारने यापुढील निवडणुका इव्हीएमवर न घेता मतपत्रिकांवर घ्याव्या, यासाठी दि. २२ जानेवारी रोजी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी इव्हीएम मशिनची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
इव्हीएम मशिनच्या माध्यमातून भाजपला पुन्हा एकदा देशावर राज्य करायचे आहे. २०२५ ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या शतकमहोत्सवात त्यांना भारतातील लाेकशाही, भारतीय राज्यघटना नष्ट करुन हिंदू राष्ट्र जाहीर करायचे आहे, असे त्ंन स्पष्ट केले. भाजप वगळता देशातील इतर पक्षांनी पुन्हा एकदा पूर्वीसारख्या मतपत्रिकांवरच निवडणुका झाल्या पाहिजेत अशी भूमिका मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, निवडणूक आयोगात राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. लाेकसभेतील बहुमताचा वापर करुन विरोधकांना संसदेबाहेरचा रस्ता दाखवून सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाला डावलून अनेक कायदे पास केले जात आहेत. कुठल्याही परिस्थितीत इव्हीएम मशिनवर निवडणुका होऊ नयेत याबाबत साताऱ्यात विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने होणाऱया आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे. संजय गाडे म्हणाले, आजमितीस १८ लाख ९४ हजार २४ इव्हीएम मशिन गायब असून लाखो मशिन खराब आहेत. याबाबत निवडणूक आयोग काहीही बोलत नाही. त्यामुळे देशाची लाेकशाही व संविधान धोक्यात आले आहे.