
कराड : मी बुधवार पेठेचा भाई आहे, असे म्हणत चाकुचा धाक दाखवून एकाने पालिका कर्मचाऱ्याकडील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. शहरातील बुधवार पेठेतील महात्मा फुलेनगरमध्ये सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत पालिका कर्मचारी सुनिल चंद्रकांत भोसले यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन गणेश संजय वायदंडे (रा. बुधवार पेठ) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बुधवार पेठेत राहणारे सुनिल भोसले हे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या मुलगा समर्थ याला गल्लीतीलच गणेश वायदंडे याने सोमवारी दुपारी दमदाटी केली. समर्थने याबाबतची माहिती वडिल सुनिल यांना दिल्यानंतर त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी ते गणेशच्या घरासमोर गेले. त्यावेळी गणेश याने, मी बुधवार पेठेतील भाई आहे. तुला ठार मारेन, असे म्हणत सुनील यांचा गळा आवळला. तसेच खिशातील चाकू काढून वार करण्याचा प्रयत्न केला. सुनील हे खाली पडल्यानंतर त्याने लाकडी दांडक्याने मारहाण करीत त्यांच्या खिशातील १ हजार १०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
याबाबत सुनील भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कराड शहर पोलीस ठाण्यात गणेश वायदंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.