
कराड ः कराड तालुक्यातील दुशेरे व कोळेवाडी येथून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील दोन रेकार्डवरील चोरट्यांना कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार दुचाकी व ज्वारी व गव्हाची चोरीस गेलेली पोती असा 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यातील एकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
आकाश उर्फ दिग्विजय बापु लांडे (रा. दुशेरे, ता. कराड) व दत्तात्रय किसन यादव (रा. तुळसण ता. कराड) अशी अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी तालुका पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे, प्रदीप धस हे पेट्रोलिंग करीत असताना दुशेरे गावातील लोकांनी दुशेरे गावातील लोकांनी चोरटा पकडला असल्याचे सांगितले. त्यावेळी गुन्हे प्रकटीकरणची टीम दुशेरे येथे पोहचली असता आकाश उर्फ दिग्विजय लांडे हा रेकार्डवरील गुन्हेगार असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यावरून त्यास अटक करून त्याच्याकडून 40 हजार रूपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. त्याला न्यायालयात हजर केले असता गुरूवार दि. 4 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोलीस हवालदार सज्जन जगताप करीत आहेत.
तसेच कोळेवाडी ता. कराड येथे रेकार्डवरील आरोपी दत्तात्रय यादव हा आला असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्यासाठी सापळा लावला. दत्तात्रय यादव याला पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जात असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याकडील चोरीची दुचाकी व त्याने कोळेवाडी येथून घरफोडी करून चोरलेली ज्वारीची सहा पोती व कोडोली येथे घरफोडी करून चोरी केलेली गव्हाची दोन पोती व त्यात वापरलेली त्याची दुचाकी असा एकूण 75 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार नितीन कुचेकर करीत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे, अभिजीत चौधरी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, प्रफुल्ल गाडे, प्रदीप धस यांनी केली.