
कराड ः विलासकाकांची संघटन शक्ती जबरदस्त होती. जिल्हा बँक त्यांनी नावारूपाला आणून विकासाचा पाया घातला. काकांकडे एक विचारांचे नैतिक अधिष्ठान होते. मंत्रीपदाच्या काळात त्यांनी अनेक खंबीर व धाडसी निर्णय घेतले. काकांना त्यांच्या स्वातंत्र्यसेनानी वडिलांकडून मिळालेली शिकवण आणि काँग्रेसची विचारधारा यामुळे ते कोणत्याही प्रलोभनांना बळी पडले नाहीत. अशा वैचारिक अधिष्ठान असलेल्या काकांच्या जाण्याने एका युगाचा अस्त झाला, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
येथील कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेले कोयना सहकारी बँकेच्या प्रवेशद्वारावरील माजी मंत्री लोकनेते स्व. लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे आ. भाई जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. अशा संयुक्त कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानावरून आ. पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.
यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी खा. जयवंतराव आवळे, सांगलीचे खा. विशाल पाटील, माजी सहकार, कृषी राज्य मंत्री आ. विश्वजीत कदम, आ. संग्राम थोपटे, कोयना सहकारी बँकेचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. चव्हाण म्हणाले, मध्यंतरीच्या काळात विलासकाका आणि मी समोरासमोर उभा होतो. त्याकाळात थोडा दुरावा होता. परंतु, मी काकांना भेटून तो मिटवला. त्यानंतर काकांनी कराडमध्ये संयुक्तपणे कार्यक्रम घेऊन सर्वांना प्रबोधन केले. आज त्याच विचारांवर आम्ही सर्वजण काम करत आहोत. काकांनी त्यांच्या कार्यकाळात माणसे जोडण्याचे काम केले. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला एवढी अलोट गर्दी आहे. येथे कुणीही कोणाला आणण्यासाठी गाड्या पाठवल्या नव्हत्या, असा टोला लगावत या कार्यक्रमातून अनेकांना बोध घेता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विलासकाकांनी सुरू केलेल्या सर्वच संस्था आज सुस्थितीत चालू असून काकांचे अपूर्ण काम उदयसिंह पाटील चांगल्या पद्धतीने पूर्णत्वास नेत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आ. भाई पाटील म्हणाले, विलासकाका म्हणजे स्पष्टवक्ता व्यक्तिमत्व आणि झगझगती मशाल होते. काकांनी सातारा जिल्हा बँक, तसेच राज्याच्या सहकारात दिलेली योगदान कधीही न विसरता येणारे आहे. सहकारातील त्यांच्या योगदानाचे एखादे पुस्तक जिल्हा बँकेने प्रकाशित करावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
बाळासाहेब थोरात म्हणाले, कराडच्या भूमीत अनेक समाजधुरीण जन्माला आले. इथे यशवंतराव चव्हाण यांची प्रेरणा घेऊन अनेक व्यक्तिमत्वं घडली. काका हे त्यातीलच एक व्यक्तिमत्व होते. डाव्या आणि गांधीवादी विचारसरणीमध्ये काकांचे नाव घ्यावे लागेल. काकांच्या अंगी जनहिताचे काम करण्याचे वैशिष्ट्य होते. त्यांच्याकडे काम करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन होता. त्यातून त्यांनी जिल्हा बँकेत शिस्तीचे बंधन घातले. काकांनी जपलेल्या पुरोगामी आणि राज्यघटनेतील मूलभूत तत्वांचा विचार जपण्याचे काम उदयसिंह पाटील करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जयवंतराव आवळे म्हणाले, काकांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक संस्था, संघटना व फॅक्ट्रा उभारल्या. परंतु, यापेक्षा सर्वात महत्त्वाचे त्यांनी कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी निर्माण केली. काका स्वच्छ चारित्र्य, मन आणि हृदयाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे त्यांना मोठा जनाधार मिळत राहिला.
श्रीमंत पाटील म्हणाले, काकांनी अतिशय प्रयत्नांतून सुरू केलेला साखर कारखाना दिमाखात सुरू रहावा, यासाठी काकांच्या प्रेमापोटी आम्ही हा कारखाना चालवायला घेतला. आज कारखाना कर्जमुक्त झाला असून तो उदयसिंह पाटील यांच्याकडे हस्तांतरित करणार आहोत. त्यांनी तो आणखी नावारूपाला आणावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रस्ताविकात उदयसिंह पाटील म्हणाले, काकांनी विविध सहकारी संस्थांची निर्मिती केली. त्यांनी घेतलेला समाजकारणाचा वसा त्यांना घराण्यातूनच मिळाला. काकांच्या मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादातून सर्व संस्था आपण आज ताकतीने चालवत आहोत. तसेच त्यांनी उभा केलेली रयत संघटनाही चालवण्यात कार्यकर्त्यांमुळे यश आले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, बँकेचे उपाध्यक्ष विजय मुठेकर, अजितराव पाटील-चिखलीकर, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रयत कारखान्याचे नामकरण करावे ः आ. विश्वजीत कदम
काकांनी अनेक लोकहिताची कामे केली. जिल्हा बँक, बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, कोयना दूध संघ, पतसंस्था, कोयना बँक, रयत कारखाना आदींच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना सक्षम केले. सातारा जिल्हा बँक सर्वच बाबतीत अग्रगण्य असण्यामध्ये काकांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन काकांनी उभारलेल्या रयत कारखान्याचे नामकरण लोकनेते विलासकाका पाटील-उंडळकर रयत कारखाना करावे, अशी इच्छाही आ. विश्वजीत कदम यांनी यावेळी उदयसिंह पाटील यांच्याकडे बोलून दाखवली.