
कराड : पुण्यातील शरद मोहोळ खून प्रकरणात कराडातील रेकॉर्डवरील आरोपी धनंजय मारुती वटकर याला अटक करण्यात आले आहे. त्याने शरद मोहोळवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे पुण्याच्या पोलिसांनी त्याला अटक केले आहे. त्याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यातही गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पुण्यातील शरद मोहोळ याचा कोथरूड भागात भरदिवसा खून झाला होता. या खुनाच्या तपासाचे धागेदोरे कराडपर्यंत पोहचले आहेत. शरद मोहोळ याचा तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला होता. खुनाच्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी तपास पथके रवाना केली होती. या तपास पथकांनी पुणे ते सातारा महामार्गावर संशयित हल्लेखोरांना अटक केली. या गुन्ह्यात दोन वकीलांनाही अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना आणखी काही धागेदोरे मिळाले. यामधे मोहोळ याच्यावर गोळीबार करण्यासाठी पिस्तुल पुरवणारा कराडचा असल्याचे समोर आले.
पुणे पोलिसांनी कराडातील धनंजय वटकर या आरोपीला ताब्यात घेवून अटक केले आहे. त्याने हल्लेखोरांना पिस्तूल पुरविल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने काही महत्वाची माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे. धनंजय वाटकर याच्यावर कराडातही यापुर्वी गुन्हे दाखल आहेत. ओगलेवाडी येथे मार्च २०२३ मध्ये तब्बल चौदा पिस्तुलांसह दहाजणांना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात वटकर याचा सहभाग होता.