ताज्या बातम्याराजकियराज्य

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साताऱ्यात भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, दोघात कमराबंद चर्चा

सातारा : विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने शिल्लक आहेत त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष तयारीला लागला आहे. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला धक्का देण्याची खेळी शरद पवार खेळत आहेत. त्यात आज साताऱ्यातील एका बड्या भाजपा नेत्याच्या घरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गेल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

रविवारी सकाळी साताऱ्यातील भाजपा नेते मदन भोसले यांच्या घरी जयंत पाटलांनी भेट दिली. या भेटीत बंद दाराआड मदन भोसले यांच्याशी जयंत पाटलांनी चर्चा केली. यात मदन भोसलेंना शरद पवारांसोबत येण्याचा प्रस्ताव दिल्याचं बोललं जातं. मदन भोसले यांचे वाई तालुक्यात वर्चस्व आहे. वाईमधील विद्यमान आमदार मकरंद पाटील हे अजित पवारांसोबत गेलेत. महायुतीत ही जागा त्यांना सोडली जाऊ शकते. त्यामुळेच मदन भोसले आणि जयंत पाटील यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

मदन भोसले यांच्या भेटीनंतर जयंत पाटील हे त्यांच्या घरातून हसतहसत बाहेर पडले. मात्र भेटीत काय चर्चा झाली याबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला. भाजपामधील सर्वजण माझे मित्र आहेत असं सांगत त्यांनी इतर तपशील बोलण्याचा टाळला. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट विविध रणनीती आखत आहे. त्याचाच भाग म्हणून पक्ष सोडून गेलेले आमदार आणि त्यांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्वाचा विचार यातूनच नाराज नेत्यांना पक्षात घेण्याचा चंग पवारांनी बांधला आहे.

कोल्हापूरातील समरजितसिंह घाटगे यांच्या निमित्ताने पहिला मोहरा शरद पवारांच्या गळाला लागला. आता त्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रात विविध ठिकाणी भेटीगाठी, मतदारसंघाचा आढावा घेण्यात येत आहे. त्यात भाजपातील नाराज हर्षवर्धन पाटील हेदेखील शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर लढतील अशी चर्चा सुरू आहे. इंदापूरात विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसोबत गेल्यानं याठिकाणी महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला सोडली जाईल अशी शक्यता असल्याने भाजपा नेते हर्षवर्धन पाटीलही नाराज आहेत. त्यात आता वाई मतदारसंघात भाजपा नेते मदन भोसले हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close