
कराड ः येथील स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ असलेल्या प्रितीसंगम बागेत गेल्या चार दिवसांपासून विषारी सापांची पिल्ले सापडत आहेत. त्याच पार्श्वभूमिवर बाग बंद करण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी नगरपरिषदेच्या प्रीतिसंगम बागेमध्ये घोणस अशा विषारी सापांची जवळपास अंदाजे बारा पिल्ली सापडली होती. अत्यंत विषारी जातीची पिल्ले असल्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या पुरूष व महिलांनी काळजी घेण्याची गरज आहे, तसेच लकवरात लवकर आम्ही प्रितीसंगम बाग सर्पमुक्त करणार असल्याचे मत कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी व्यक्त केले.
कराड प्रतिसंगम परिसराची त्यांनी कर्मचाऱ्यांसमवेत पाहणी केली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते पुढे म्हणाले, नगरपरिषदेमार्फत प्रितीसंगम बाग ही बंद करण्यात आली आहे. उपरोक्त ठिकाणी नगरपरिषदेमार्फत व सर्पमित्रांच्या मदतीने आणखी काही पिल्ले आहेत का याची शोध मोहिम घेण्यात येत आहे. तसेच नगरपरिषदेमार्फत इथे जेसीबी व पोकलॅन लावून जिथे साप थांबू शकतात अशी शक्यता आहे असा परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे. बुरूजाच्या साईडला जे मातीचे ढिगारे आहेत तेही नगरपरिषेने जेसीबी व पोकलँडच्या सहाय्याने कामकाज सुरू करण्यात आले आहे. तरी सर्व कराडवासियांना कराड नगरपरिषदेमार्फत आवाहन करण्यात येते की काही दिवस प्रितीसंगम बाग ही बंद राहणार आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. जेणेकरून सर्पदंश होणार नाही व कोणाच्याही जिवीतास धोका पोहोचणार नाही. नगरपरिषदेमार्फत वेळोवेळी देणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करावे. तसेच ही बाग येत्या आठ ते दहा दिवसांकरीता बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये सापांची शोधमोहीम घेऊन बाग सर्पमुक्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
तसेच साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी साफसफाई करताना शूज, हॅन्डग्लोज वापरूनच काम करावे. कराड वासियांच्यासाठी मदत करणाऱ्या सर्प मित्रांना नगरपरिषेची लागेल ती मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.