ताज्या बातम्याराजकियराज्य

उद्धव ठाकरे यांचा मला फोन आला होता म्हणाले आदित्यला सांभाळून घ्या : नारायण राणे

रत्नागिरी : भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नारायण राणे यांच्याकडून दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन वारंवार आदित्य ठाकरे यांच्याकडे बोट दाखवलं जात आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणाचे पुरावे विधानसभेत बंद लिफाफ्यात सादर केले होते. या प्रकरणी तपास सुरु आहे. पण अद्याप त्याबाबत काहीच माहिती समोर येऊ शकलेली नाही. असं असताना नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन केला होता. या फोनमधून त्यांनी आदित्यला सांभाळून घ्या, अशी विनंती केल्याचा दावा नारायण राणे यांनी केला.

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूआधी दिशा सालियन हिचा मृत्यू झाला होता. दिशा सालियन ही सुशांतची माजी मॅनेजर होती. सुशांतच्या मृत्यूच्या एक महिन्याआधी दिशाचा मृत्यू झाला होता. दिशा घराच्या बाल्कनीतून खाली पडून तिचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला दिशाने आत्महत्या केल्याची चर्चा होती. यानंतर या प्रकरणावरुन नारायण राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे संबंधित प्रकरणाला वेगळे वळण लागले. याच प्रकरणी आदित्य ठाकरे यांचं नाव येऊ नये किंवा आदित्य यांचं नाव घेऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांचा आपल्याला फोन आला होता, असा मोठा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

यावेळी नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोनबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. “आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना फोन लावून दिला. आदित्यला सांभाळून घ्या. तुम्हालाही दोन मुलं आहेत, असं मला फोनवर उद्धव ठाकरे बोलले. मग मी सांगितलं तुमच्या मुलाला असे संध्याकाळचे सोडू नका सातच्यानंतर”, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या जोडो मारो आंदोलनाला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं. “त्यांना दुसरं काय येतं, जोडो मारो आंदोलन करणारे पुतळा उभारल्यानंतर आठ महिन्यात एकदा तरी नतमस्तक होण्यासाठी आले का? हे सगळं झाल्यानंतर डोकं आपटून घेत आहेत”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

“शिवरायांच्या पुतळा कोसळल्या प्रकरणातील आरोपी जयदीप आपटे कायम स्वरूपी वॉन्टेड राहू शकतो का? त्याला अटक करावी लागेल. त्याने माहिती दिल्याशिवाय बांधकाम कुठल्या दर्जाचं होतं, काय त्याच्यामध्ये दोष होता, तेव्हाच कळणार. तुम्ही थोडा वेळ थांबा. विरोधकांना घाई लागली आहे. त्यापेक्षा पत्रकारांना जास्त घाई लागली आहे, थोडा वेळ थांबा. काहीतरी अडचणी असू शकतात”, असं नारायण राणे म्हणाले.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेबाबत नारायण राणे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “काय बोलणार विजय वडेट्टीवारला, फक्त नावात विजय आहे. मात्र शब्द उच्चारतात त्यात पराभव दिसतो. कशाला लपवून ठेवणार आपटेला? तुला सर्व मिळणार माहिती, तू विरोधी पक्षनेता आहेस आणि माझा चेला, असे प्रश्न विचारतो याचं दुःख मला वाटतं”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाबाबत सुरु असलेल्या शर्यतीवरही नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार एक-दोन दिवसानंतर एक-दोन स्टेप मागे पुढे जातात. आज बोलतील ते उद्या असेलच असं नाही. निवडणुकीच्या वेळेला काय बोलतील ते कोणी सांगू शकत नाही”, असं नारायण राणे म्हणाले.

“मी एक विनंती करतो, पुतळा कोसळल्यानंतर किती दिवस झाले? आता दुसरे विषय घ्या जे लोकांच्या उपयोगी आहेत. पुतळा उभारला जाणार, महाराजांचा कोणी काही केलं तरी पुतळा उभारला जाणार आणि दर्जेदार बनवणार”, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.

“तीन-चार वर्षांपूर्वी मी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की वैभववाडीतून कोल्हापूर रेल्वे मार्ग झाल्यास इथल्या विकासाला चालना मिळेल. दळणवळणासाठी इकडचा माल कोल्हापूरला पाठविण्यासाठी सोपं जाईल. त्यासाठी ती लाईन आवश्यक आहे. त्यावर ते म्हणाले राणेजी मैं करता हुँ”, अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close