
कराड : स्कायलाइन रायफल व पिस्टल शूटिंग अकॅडमी मलकापूर व श्री मळाई देवी शिक्षण संचलित आ. च. विद्यालय पोतले ता.कराड यांचे संयुक्त विद्यमाने मलकापूर येथे शालेय जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धा नुकत्याच डीएमएस कॉम्प्लेक्स मलकापूर येथील स्कायलाइन अकॅडमी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात, तालुका क्रीडा अधिकारी सौ. संगीता जगताप, रवी पाटील, महेंद्र भोसले, आनंदराव जानुगडे, उदय काळे, पवन पाटील, सारंग थोरात, विविध भागातून आलेले खेळाडू त्यांचे प्रशिक्षक यांचे उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
उद्घाटन प्रसंगी खेळाडूंना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अशोकराव थोरात म्हणाले, ग्रामीण भागातील खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले पाहिजेत यासाठी खेळाडूंना मिळणाऱ्या बक्षीसाबरोबरच खेळासाठी येणारा खर्च ही तितकाच महत्त्वाचा असून शासन स्तरावर त्याचा विचार व्हावा असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील खेळाडू नेमबाजी सारख्या खेळात चमकला पाहिजे त्याचबरोबर त्यातून अधिक खेळाडू तयार होतील असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा कराड तालुका क्रीडा अधिकारी सौ. संगीता जगताप खेळाडूंना मार्गदर्शन करताना म्हणाल्या, खेळाडूंनी अभ्यासाबरोबर खेळाकडे लक्ष देऊन खेळात प्राविण्य मिळवून आपले देशाचे नाव उज्वल करावे असे सांगितले.
नेमबाजीसारखे दुर्मिळ खेळाचे प्रशिक्षण मलकापूर मध्ये पहिल्यांदाच उपलब्ध झाले असून त्याचा फायदा खेळाडूंनी करून घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले.
सदर शालेय नेेमबाजी स्पर्धा मुले-मुली 14,17,18 या वयोगटात भरवण्यात आल्या होत्या. या स्पर्धांसाठी शहरी व ग्रामीण भागातील खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे संयोजक स्काय लाईन रायफल अँड पिस्टल शूटिंग अकॅडमी मलकापूरचे संचालक श्री. सारंग थोरात म्हणाले, रायफल व पिस्टल शूटिंग जिल्हास्तरीय स्पर्धेचे नियोजन करून जिल्ह्यात अशा प्रकारच्या स्पर्धा भरवण्याचा पहिला मान मिळाल्याचा सार्थ अभिमान वाटतो तसेच ग्रामीण भागातील नेमबाजी सारख्या खेळाची खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिल्याचा मनस्वी आनंदही होतो आहे. असे ते म्हणाले.
कार्यक्रमास प्रशिक्षक रितूल कुंडले, वैशाली थोरात, विकास रणसिंग, अल्ताफ शिकलगार, विविध ठिकाणाहून आलेले खेळाडू त्यांचे प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.