क्राइमराज्यसातारा

कोपर्डे हवेली येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्याचा हल्ला

कराड : सायंकाळच्या सुमारास आईच्या हाताला धरून घरासमोर चालत असलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्याने हल्ला करून तिच्या दंडाचा चावा घेतला. या हल्ल्यात चिमुकलीला कुत्र्याने सुमारे 50 फूट फरपटत शेतात नेले. आईने आरडाओरडा करून प्रसंगावधान राखत कुत्र्याला पळवून लावल्याने मोठा अनर्थ टळला. कोपर्डे हवेली तालुका कराड येथे मंगळवार दिनांक तीन रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित चिमुकलीवर रात्री उशिरापर्यंत कराड येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

अविरा स्वप्निल सरगडे (वय 3, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड) असे कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून व ग्रामस्थांकडून समजलेल्या माहितीनुसार तीन वर्षाची चिमुकली अविरा सरगडे ही मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घरासमोर खेळण्यासाठी आपली आई पुजा यांच्याबरोबर घराबाहेर आली. यावेळी चिमुकली आपल्या आईच्या हाताला धरून घरासमोर चालत असताना अचानकपणे मोकाट कुत्र्याने पाठीमागून येऊन तिच्यावर झडप घातली. कुत्र्याने अविराच्या हाताला, दंडाला चावा घेऊन तिला सुमारे 50 फूट फरपटत शेतात नेले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अविराची आई पूजा यांनी आरडाओरडा करून कुत्र्याला पळवून लावले. दरम्यान कुत्र्याने अविराच्या दंडाला चावा घेतल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत होता. तशा परिस्थितीत पूजा यांनी ग्रामस्थ व नातेवाईकांच्या मदतीने अविराला उपचारासाठी कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात आणले. येथे त्यांच्यावर रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते.

चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला केल्याच्या घटनेमुळे कोपर्डे हवेलीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्याने असे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वीच मलकापूर येथेही पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातल्याची घटना घडली होती. ही बाब सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगण यांच्या लक्षात येताच त्यांनी सहकार्यांच्या मदतीने संबंधित कुत्र्याला शहराच्या बाहेर पिटाळून अनेकांचे जीव वाचवले होते. दरम्यान कोपर्डे हवेली येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close