
कराड : कराड तालुक्यातील तहसील कार्यालयातील सेतूमध्ये 50 रुपये घेऊन 34 रुपयाची पावती दिली जाते. परंतु शासन जीआर व परिपत्रक याची माहिती घेतली असता 33 रुपये 60 पैसे एवढेच रुपये घेऊन अधिकृतपणे पावती द्यायला हवी. परंतु तसे कराड सेतू कार्यालयामध्ये होत नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊनही यामध्ये कोणताही बदल झाल्याचे दिसून येत नाही. कराड सेतू मध्ये चाललेल्या या प्रकाराची सर्वत्र खुमासदार चर्चा असून याला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे.
मुळात कराड सेतू कार्यालयाच्या ठेकेदाराने सातारा तालुका तहसील कार्यालयातील सेतू मध्ये असाच मोठा गौडबंगाल केल्याचे निदर्शनास आलेले आहे. नागरिकांच्याकडून ज्यादा रक्कम वसूल केलेली आहे. ती 10 लाख 47 हजार 400 रुपये व प्रतिज्ञा पत्राचे 13 लाख 2 हजार 336 रुपये असे एकूण 23 लाख 49 हजार 736 रुपये एवढी रक्कम तहसीलदार यांचे नावे असलेल्या सेतू खात्यामध्ये जमा करण्याबाबतच्या सूचना व पत्रव्यवहार तहसीलदार सातारा यांनी केलेला आहे. परंतु या ठेकेदाराने ही रक्कम न भरता शासनाच्या विरोधात कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे. ही केस सुरू असताना व शासनाची फसवणूक केलेली असताना या व्यक्तीस कराड तहसील कार्यालयातील सेतू ठेका कसा काय दिला जातो. या मागचा मुख्य सूत्रधार कोण आहे तोही उघडा देणे गरजेचे आहे. सुमारे 23 लाखाचा मलिदा खाणाऱ्या या ठेकेदाराला पाठीशी का घातले जाते याबाबत शासनाला कोणतेच गांभीर्य नाही. ज्या व्यक्तीने शासनाला फसवून शासनाचे विरोधात कोर्टामध्ये केस दाखल करते त्या व्यक्तीस दुसऱ्या तालुक्यातील सेतू ठेका दिला जातो व त्याचे वरिष्ठांकडून लाड केले जातात ही बाब खेदजनक आहे.
दिनांक 3/9/2024 रोजी तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लोकांना देत असलेल्या सेतू मधील पावत्यांच्या पाठीमागे 2024 लोकसभेमधील फॉर्म नंबर 17 C पार्ट टू या शासकीय निवडणुकीतील कागदपत्रावरती पावत्या दिल्या जातात या कागदावरती लोकसभेसाठी उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांची नावे ही लिहिलेली आहेत. अशी माहिती देऊनही दिनांक 4/9/2024 रोजीही याच कागदावरती पावत्या लोकांना दिलेल्या आहेत.
मुळात निवडणुकीतील महत्त्वाचा असलेला कागद सेतू कार्यालयामध्ये येतातच कसे हा संशोधनाचा विषय आहे. तसेच या सेतू चालकांसाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजून एक कॉन्ट्रॅक्ट दिल्याचे बोलले जात आहे.
तहसील कार्यालयातील सेतू मध्ये जी पावती दिली जाते ती खाजगी सॉफ्टवेअर मधून दिली जाते. परंतु त्या पावती वरती जो शिक्का दिसून येत आहे तो तहसील कार्यालय तालुका वाई जिल्हा सातारा असा दिसत आहे. म्हणजेच वाई तालुक्यातील सॉफ्टवेअर कराड मधील सेतू मध्ये वापरून लोकांना पावत्या दिल्या जातात. मुळात शासनाने ऑनलाईन पावती देण्याबाबत शासन परिपत्रक व जीआर काढलेले असताना हा सेतू ठेकेदार खाजगी सॉफ्टवेअर मधून पावत्या देत आहे. हे अधिकाऱ्यांना माहिती असूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. याबाबत या सेतू ठेकेदाराचे वरिष्ठ पातळीवरती लागेबांधे असल्यामुळे या सर्व गोष्टी चालू असल्याचे बोलले जात आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून या सेतू कार्यालयामध्ये चाललेला माजोर्डेपणा बंद करावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
क्रमशः