
कराड ः कुसूर, ता. कराड येथे राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या व्यावसायीकाचा मृतदेह गुरूवारी संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी अकस्मात मयत अशी नोंद करून कराड ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू असताना संबंधिताचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदन अहवालातून ही बाब समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन त्यांच्या शोधासाठी तपास पथके रवाना केली असल्याची माहिती कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली.
शिवाजी लक्ष्मण सावंत (वय 52, रा. कुसुर) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुसूर येथील शिवाजी सावंत हे किराणा दुकानदार होते. गावात ते त्यांचा भाऊ बाळासाहेब तसेच इतर कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास होते. 1 सप्टेंबर रोजी शिवाजी सावंत हे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जेवण करून झोपण्यासाठी गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून ते कोणालाही दिसले नाहीत. रात्रीपर्यंत ते घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कोठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे भाऊ बाळासाहेब सावंत यांनी याबाबतची फिर्याद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार शिवाजी सावंत बेपत्ता असल्याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.
दरम्यान, गुरुवारी, दि. 5 सकाळी कुसुर येथील सोनारडोह नावच्या शिवारात संतोष खाडे यांच्या शेतामध्ये शिवाजी सावंत यांचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी तसेच पंचनामा केला. मात्र, मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्यामुळे मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होत नव्हते. शवविच्छेदनात मात्र मृत्युचे कारण स्पष्ट झाले असून धारदार शस्त्राने वार केल्यामुळे अती रक्तस्त्राव होवून शिवाजी सावंत यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांना हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप करीत आहेत.