आम्हाला गोळ्या घातल्या तरीही आता थांबणार नाही
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारीला मुंबईकडे निघणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. तर, सरकारने आम्हाला मारहाण केली किंवा गोळ्या घातल्या तरीही आता थांबणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याच रुग्णालयात त्यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारला थेट इशारा दिला आहे.
यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, आम्हाला मुंबईला जायची हौस नाही. आमच्या मुलांचे पुढील काळात खूप वाटोळं होणार आहे, त्यामुळे त्यांना आम्हाला आरक्षण द्यायचं आहे. हीच आमच्या गोरगरीब मराठ्यांची भूमिका असून, त्यावर आम्ही ठाम आहे. आता शेवटचं सांगतो, मुंग्यासारखे मराठे घराच्या बाहेर पडणार आहे. सरकारने मारहाण केली केली किंवा गोळ्या घातल्या तरीही आरक्षणाच्या मागणीवरून मागे हटणार नाही. ज्याज्या वेळी मी बोलतो, त्या-त्यावेळी ते करतो. आता मुंबईला गेल्यावर माघार घेणार नाही. संपूर्ण शक्ती पणाला लावण्याची माझी तयारी आहे. वेळप्रसंगी जीव देखील द्यायची तयारी आहे. मात्र, आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही गोरगरीब मराठे मागे हटणार नाही असे जरांगे म्हणाले.
आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नका, मराठा समाजाची नाराजी अंगावर ओढून घेऊ नका असे देवेंद्र फडणवीस यांना मी पाच वेळा सांगितले आहे. तुम्ही आमचे ट्रॅक्टर अडवू नका, तसेच अडवले तरीही आम्ही मुंबईत येणारच आहे. आंतरवाली सराटी सारखे प्रयोग आता पुन्हा करू नका. कोट्यावधी मराठे एकत्र आले आहेत. वाटेला जाल तर तुम्हाला जड जाईल. तसेच, आम्ही पोलिसांकडे अर्ज करूनच मुंबईच्या दिशेने जाणार असल्याचे जरांगे म्हणाले.
रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी आज दुपारी पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी संदीपान भुमरे यांनी जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करत, तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला. याचवेळी मनोज जरांगे आणि मंत्री भुमरे यांच्यात मराठा आरक्षणावरून देखील चर्चा झाली. तर, जरांगे यांनी यावेळी आपल्या काही मागण्य देखील भुमरे यांच्याकडे मांडल्या. ज्यात, निष्पाप मराठ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, आंदोलन काळात अपघातात मयत झालेल्या मराठ्यांना मदत करण्यात यावी, RTO परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात आणि सारथीबाबतचे प्रश्न तातडीने सोडवावे, अशा मागण्या जरांगे यांनी सरकारकडे केल्या आहेत.