
कोल्हापूर : राज्यात स्वाभिमानीची ताकद असलेल्या कोल्हापूर, हातकणंगले, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी हे सहा लोकसभा मतदारसंघ लढवणार आहे. आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय अडीच वर्षांपूर्वीच घेतला आहे. त्या दिशेने वाटचालही सुरू आहे. त्यामुळे यापुढे लोकसभा निवडणुकीसंबंधी चर्चा करण्यासाठीसुद्धा महायुती, महाविकास आघाडीने आमच्याकडे येऊ नये, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांसमोर बोलताना मांडली.
सर्वच पक्षांमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात जागा लढवण्याची वल्गना आम्ही करणार नाही. मात्र, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे जाळे, संच असलेल्या हातकणंगलेसह सहा मतदारसंघ लढवणार आहे.
भाजपने अनेक पक्ष फोडले. शेतकरीविरोधी अनेक निर्णय घेतले आहेत. राजकारणात लोकप्रतिनिधींचा घाऊक घोडेबाजार केला. यामुळे मतदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यांना वाट मोकळी करून देण्यासाठी सहा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. यापूर्वीच आम्ही लोकसभा निवडणुकीसंबंधीची राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार महायुक्ती, महाविकास आघाडीसोबत न जाता स्वतंत्रपणे सहा जागा लढवणार आहे.