शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार चार महिन्यांत जेलमध्ये जातील
माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचा दावा

सातारा : महाराष्ट्र राज्य सहकारी शिखर बँकेच्या 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचे खरे सूत्रधार उपमुख्यमंत्री अजित पवार हेच आहेत. शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार पुढील चार महिन्यांत जेलमध्ये जातील, असा दावा माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी केला आहे.
उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवार हे दोषी आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पण पुढे काहीच कारवाई झाली नाही. याप्रकरणी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्याची मागणी करणार असून अजित पवार पुढच्या चार महिन्यांत तुरुंगात जातील, असे शालिनीताई पाटील म्हणाल्या.
अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपबरोबर गेल्याची चर्चा आहे. याबाबत शालिनीताई म्हणाल्या, तुरुंगात गेलेल्या माणसाला निवडणुकीला उभं राहता येणार नाही. त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यता नाही. तुरुंगात गेल्यावर तिथे त्यांना भेटायलाही कोणी जाणार नाही. अजित पवार हे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी सत्तेत गेलेत, असा टोला त्यांनी लगावला.
शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्याशी जे केले ते सांगून केले. पक्षाच्या बचावासाठी त्यांनी ती भूमिका त्या वेळी घेतली. कॉँग्रेसमध्ये मतभेद झाल्यावर शरद पवार पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना केली. राष्ट्रवादी हे नाव आणि पक्षाचे चिन्ह हे त्यांनी मिळवलेले आहे. त्यामुळे त्यावर त्यांचा हक्क आहे. अजित पवारांबरोबर गेलेले पुन्हा शरद पवारांसोबत आले तर पुन्हा निवडणुकीत निवडून येतील, असे शालिनीताई पाटील म्हणाल्या.
शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्याविरोधात उच्च न्यायालयात एकूण तीन अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. या प्रकरणात न्यायालयाने आदेश देऊनही कारवाई झाली नसल्याने पाच वर्षे फुकट गेली आहेत. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी विनंती करण्यात येईल. तसेच राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे अजित पवारांच्या विरोधात चार्जशीट दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करण्याची मागणी करणार असल्याचे शालिनीताई म्हणाल्या.
राज्यात याचं बंड, त्याचं बंड, ग्रामसेवकांचे प्रश्न, अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, अवकाळी पावसाने झालेलं शेतकऱयांचं नुकसान, मराठवाडय़ातला दुष्काळ, कांदा आणि उसाचा प्रश्न, अशा कुठल्याही प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंना तोडगा काढता आला नाही. कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी 10 वेळा शब्द दिला. ते दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेले, पण शहांनी त्यांची भेट घेतली नाही. त्यानंतर फडणवीस दिल्लीच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना भेटले. त्यांनी केंद्र सरकार कांदा विकत घेईल असे सांगितले, पण नाही घेतला. यांना दिल्लीत कुणी विचारत नाही, असे शालिनीताई पाटील म्हणाल्या.
2024 च्या निवडणुकीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसतील. कारण शिंदे पक्ष फोडून बाहेर पडले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाने ते निवडून आले आणि सत्तेसाठी तिकडे गेले आहेत. त्यांना सरकार चालवता येत नाही, असे शालिनीताई म्हणाल्या.