ईडीकडून बारामती ॲग्रोची 50 कोटींची प्रॉपर्टी जप्त

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सक्तवसुली संचानालय अर्थात ईडीकडून बारामती ऍग्रोची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे.
या कारवाईत एकूण 161 एकर जमीन ईडीने जप्त केली आहे. जपवळपास 50.20 कोटी रुपयांची ही मालमत्ता असल्याची माहिती समजत आहे. बारामती अॅग्रो ही शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीची कंपनी आहे.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीची काही दिवसांपासून ईडीकडून चौकशी सुरू होती. यासाठी रोहित पवार यांची दोनवेळा चौकशीही करण्यात आली. या प्रकरणात ईडीने बारामती अॅग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकरची संपत्ती जप्त केली आहे. त्यामध्ये जमीन, शुगर प्लंट, साखर कारखान्याची इमारत आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.
कारखान्याला घरघर लागल्यानंतर त्याचा राज्य सहकारी बँकेने लिलाव केला. हा कारखाना 50 कोटी रुपयांमध्ये रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो लिमिटेडने खरेदी केला होता. या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणात ईडीकडून बारामती अॅग्रोची चौकशी सुरू होती. या लिलाव प्रक्रियेतील कंपन्यांचे एकमेकातले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.
बारामती अॅग्रो, हायटेक इंजिनिअरिंग, समृद्धी शुगर या कंपन्या लिलावात सहभागी आहेत. हायटेक कंपनीने लिलावासाठी पाच कोटी रूपयांची रक्कम भरली होती. ती रक्कम बारामती ऍग्रो कडून घेतल्याची चर्चा आहे. विविध बँकांतून खेळत्या भांडवलासाठी घेतलेली रक्कम बारामती अॅग्रोने कारखाना खरेदीसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बारमती ऍग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीनं कारवाई केली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे बारमती अॅग्रो कंपनीची मालकी आहे. मागील वर्षी याच संदर्भात रोहित पवारांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणी आमदार रोहित पवार यांची या आधी दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे.