“दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची”
उद्धव ठाकरे यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खुली ऑफर

धाराशिव : नितीन गडकरी जी भाजप सोडून महाविकास आघाडीत या, तुम्हाला खासदार करतो, अशी खुली ऑफर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री तथा भाज नेते नितीन गडकरी यांना दिली आहे.
भाजपकडून लोकसभा उमेदवारीची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, ज्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव नसल्याने चर्चेला उधाण आले आहेत. यावरूनच उद्धव ठाकरे यांनी गडकरी यांना भाजप सोडून महाविकास आघाडीत सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. सोबतच महाविकास आघाडीमधून खासदार करण्याचे आश्वासन देखील ठाकरेंनी दिले आहे.
“दिल्लीपुढे झुकू नका, दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारा. महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी आमची” अशी खुली ऑफर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली आहे. उद्धव ठाकरेंची धाराशिवमध्ये सभा झाली तेव्हा ते बोलत होते.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “अहो नितीन जी सोडून द्या भाजप आणि राहा उभं, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो. महाराष्ट्राचं पाणी दाखवा, महाराष्ट्राची धमक दाखवा. महाराष्ट्र दिल्ल समोर कधीही झुकला नाही. आग्र्यात औरंगजेबासमोर छत्रपती शिवाजी महाराज झुकले नव्हते, ती यांच्यासमोर झुकणार. आज मी नितीन गडकरी यांना जाहीर सांगत आहे, राजीनामा द्या, आम्ही तुम्हाला महाविकास आघाडीकडून निवडून आणतो,” असे ठाकरे म्हणाले.
पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘जय श्रीराम घोषणा आहे, आम्ही देखील श्रीरामाचे भक्त आहोत. त्यावेळी जे काही उसळले होते, तेव्हा भारतीय जनता पक्षाचं कुणीही रस्त्यावर फिरकायला देखील तयार नव्हतं. तेव्हा त्यांच्या छातीत धडकी भरली होती. ज्यावेळी नरेंद्र मोदी यांचे नाव कोणाला माहित नव्हतं, त्यावेळी पासून आम्ही हिंदुत्वाचा झेंडा घेऊन राज्यामध्ये भाजपच्या कित्येक पट पुढे गेलो होतो. तुळजाभवानी आईची शपथ घेऊन सांगतो, 2019 मध्ये अमित शाहांनी मला अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्री पद आपण दोघेही वाटून घेऊ असा शब्द दिला होता. अमित शहा खोटं बोलत असल्याचं मी तुळजाभवानी आईची शपथ घेऊन सांगत आहे. त्यावेळी त्यांनी तो शब्द मोडला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
2021 पर्यंत भाजपने आमचा वापर करून घेतला. आज ते म्हणत आहे उद्धव ठाकरे पक्षप्रमुखच नाही. मग त्यावेळी मातोश्रीमध्ये तुम्ही कुणाला भेटायला आले होते. घराणेशाही वर आज तुम्ही बेंबीच्या देठापासून बोंबलत आहात. पण जेव्हा तुम्ही मातोश्रीमध्ये येऊन भेटला, तेव्हा तुम्हाला माहित नव्हतं का मी बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र आहे. आज घराणेशाहीवर बोंबलत आहात असेही उद्धव ठाकरे म्हणाले.