
कराड : गौण खनिज उत्खनन करायचे असल्यास ज्या गावातून ज्या ठिकाणापासून उत्खनन करायचे आहे. तेथील तहसील कार्यालय उपविभागीय कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून गौण खनिज उत्खनन करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. मात्र कराड तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या हातावर दक्षिणा ठेवल्याशिवाय गौण खनिज उत्खनन परवानगी मिळणे कठीण झाले आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील अनेक तहसील कार्यालयात फक्त तीन ते चार दिवसात गौण खनिज परवानगी मिळते. मात्र, कराड तहसील कार्यालय येथे कागदपत्रांची पूर्तता करून महिना महिनाभर परवानगीसाठी वाट पाहावी लागते, या सर्व प्रकारामुळे गौण खनिज अधिकाऱ्यांच्या कारभाराविषयी शंका उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातीलच असलेले वडूज तहसील कार्यालयातून गौण खनिज उत्खननाची परवानगीसाठी कागदपत्राची पूर्तता करून चलन भरल्यानंतर गौण खनिज उत्खनन करण्यासाठी तात्काळ परवानगी आदेश दिला जातो. यासाठी अर्जदार यांनी अर्ज दिल्यानंतर वडूज तहसील कार्यालयाकडून सर्व चौकशी करून तसेच चलन भरून घेऊन अर्जदारास साधारण तीन ते चार दिवसांमध्ये गौण खनिज उत्खनाचा आदेश दिला जातो.
परंतु सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातून सर्वात जास्त महसूल जमा होत असताना कराड तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागाकडे गौण खनिज उत्खनन करण्यासाठी अर्जदाराने अर्ज दिल्यानंतर साधारण 25 ते 30 दिवसांमध्ये आदेश दिला जातो. मिळालेल्या माहितीनुसार कराड तहसील कार्यालयातून एक ते दीड महिन्यामध्ये गौण खनिज उत्खनन करण्यासाठी आलेल्या अर्जावरती आदेश दिलेले नाहीत. ज्या लोकांना प्रामाणिक व्यवसाय करायचा आहे त्यांनी रीतसर परवानगी मागितली असताना ती देण्यासाठी एवढा विलंब लावण्याचे कारण काय ? गौण खनिज करणाऱ्या व्यवसायिकांनी अधिकाऱ्यांना दक्षिणा हातावर ठेवल्याशिवाय कोणताही कागद पुढे सरकत नाही अशी चर्चा सर्वत्र आहे. याच कारणामुळे गौण खनिज उत्खनन परवानगी महिना महिने मिळत नसल्याचे बोलले जात आहे.
एका जिल्ह्यामधील एखाद्या तालुक्यातून तीन ते चार दिवसांमध्ये परवानगी दिली जात असेल तर दुसऱ्या तालुक्यामध्ये वीस ते पंचवीस दिवसाचा अवधी लावण्याचे कारण काय असू शकते याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून याचा खुलासा करावा अशी मागणी व्यावसायिक व जनतेतून होत आहे.
क्रमशः