राजकियराज्यसातारा

सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चेचा मार्ग खुला करावा : आ. पृथ्वीराज चव्हाण

शेणोलीत विविध विकासकामांची उद्धघटने ; सरकारवर टिकेची उठवली झोड

कराड : मनोज जरांगे – पाटील हे तुमच्या – आमच्यासाठी लढत आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून गंभीर पाऊले उचलावीत. व त्यांच्याशी चर्चेचा मार्ग खुला करावा. अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तसेच यापूर्वी सरकारने मराठा आरक्षणाबाबतचा दिलेला शब्द मोडला आहे. मात्र त्यांनी केलेल्या मागण्या तात्काळ मान्य केल्या पाहिजेत. त्यांचे उपोषण थांबवून त्यांचा जीव वाचला पाहिजे, असेही ते म्हणाले.

शेणोली (ता. कराड) येथील विविध विकासकामांच्या उद्धघटन व भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ नागरिक विजय यशवंत पाटील अध्यक्षस्थानी होते. अॅ ड. उदयसिंह पाटील – उंडाळकर, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते, कराड तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कोयना सहकारी बँकेचे चेअरमन रोहित पाटील, संचालक अजित पाटील, कराड तालुका खरेदी – विक्री संघाचे उपाध्यक्ष जे. डी. मोरे, कोयना सहकारी दूध संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, संचालक अधिकराव जगताप, शिवाजीराव गावडे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे शाखा अभियंता विजय जाधव, डी. आर. चव्हाण, कराड दक्षिण युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिग्विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. चव्हाण म्हणाले, १९०२ मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. ते आरक्षण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रद्द झाले. त्यानंतर आरक्षण देण्याचे कोणी धाडस केले नाही. पण मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले. पण हेही आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्या काळात टिकवून ठेवता आले नाही.

ते म्हणाले, २०१० ते २०१४ या कालावधीत मतदारसंघात १७०० कोटींची विकासकामे झाली. तुमच्या आशीर्वादामुळे मी मुख्यमंत्री झाल्यामुळे ही कामे करता आली. परंतु काही गावात नथदृष्ट लोकांनी विकासाला खो घातला. गेली दहा वर्षे खूप अडचणीची गेली. विरोधी सरकारमुळे अपेक्षित कामे झाली नाहीत. परंतु दहा वर्षानंतर पुन्हा सरकार बदलणार आहे. लोकसभेला याचा ट्रेलर लोकांनी दाखवला आहे.

ते म्हणाले, या सरकारचे दिवाळे निघाले आहे. शहाणा माणूस आल्याशिवाय राज्यात स्थिरता येणार नाही. राज्य सरकारला एकही प्रश्न सोडवता आलेला नाही. येत्या निवडणुकीनंतर काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार आहे. व मुख्यमंत्री असताना झालेला कराड दक्षिणचा विकास पुन्हा होणार आहे.

ते म्हणाले, विकासाचे फेक बोर्ड लावणाऱ्या लोकांना ते बोर्ड लावू द्या.  यशवंतराव मोहिते व विलासकाकांनी या मतदारसंघात विशिष्ठ विचार धारेवर राजकारण केले.

अॅ ड. उदयसिंह पाटील म्हणाले, विलासकाकांनी प्रस्तापित व सरंजामदारांच्या जोखडातून रयत संघटनेच्या माध्यमातून समाजाला बाहेर काढले. ही संघटना राष्ट्रीय विचारधारेशी संलग्न होती. काही लोकं तुमचा बुध्दीभेद करत आहेत. त्यांना खतपाणी घालू नका. ते लोक व्यक्तिगत स्वार्थ महत्वाचा मानून तुम्हाला गुलाम करून आपला हेतू साधत आहेत. त्यांना मालक आणि शासक बनून तुम्हाला गुलाम बनवायचे आहे. त्यांच्या बोलण्यात तोच पूर्वीचाच अहंभाव आहे. त्याला विलासकाकांनी कायम विरोध केला. या अहंभावाला त्यांनी साखरेचे कोटींग चढवले आहे. व्यक्तिगत फायद्यासाठी गुलाम झाला, तर तुमचे भविष्य अंधकारमय होईल.

ते म्हणाले, ३५ वर्षे काकांनी या प्रवृत्तीविरोधात संघर्ष केला. व गेल्या दहा वर्षात बाबांनी या संघर्षात तुम्हाला वाचवून विकासाच्या धाग्याने बांधले आहे, या नेतृत्वाला जपा. हा संघर्षाचा लढा अखंडपणे सुरू राहणार आहे. आपला चाललेल्या मेळ्यात प्रत्येकाने योगदान द्यावे. व येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत बाबांना भरघोस मतांनी निवडून द्यावे. यामुळे तुमचा मान, सन्मान वाढणार आहे.

प्रा. धनाजी काटकर म्हणाले, विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. कृष्णाकाठावर ऊसाचे राजकारण केले जायचे. त्या जोखडातून सोडविण्यासाठी विलासकाकांनी रयत कारखान्याची निर्मिती केली. व पत्तीस वर्षे विलासकाकांनी विकासाचे राजकारण केले. या मतदारसंघात आजपर्यंत सुसंस्कृत राजकारण चालत आले आहे. येत्या काळात तुमच्यापर्यंत अनेकजण योजनांचे कुलूप घेवून येतील, त्यांना वेळेत ओळखा. येत्या दोन महिन्यात राज्यातील सरकार बदलणार आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून राज्याचा मुख्यमंत्री निवडून देणार आहोत. मतदान दिवशी मताचे दान करा. मताची विक्री करू नका. पृथ्वीराजबाबा आणि उदयसिंहदादा गट येत्या निवडणुकीत एकमुखाने लढा देणार आहे. आपण पृथ्वीराजबाबांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार आहोत. कारण राज्यातील आर्थिक स्थिती खूप वाईट आहे. ती सावरण्यासाठी बाबांसारखे नेते हवे आहेत.

यावेळी अभियंता डी. आर. चव्हाण व कराड दक्षिण युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झालेबद्दल विशाल गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. पैलवान प्रमोद कणसे, महेश कणसे, प्रशांत पाटील, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अनिल कणसे, नानासाहेब कणसे, संपत कणसे, समीर मुल्ला, शंकर आगलावे, दिपक धोत्रे, निवास गुणवंत, हजरत अली शिकलगार, सुहास जगताप, प्रकाश साळुंखे, धोंडिराम जंगम, सुधाकर कणसे, विशाल गायकवाड, अजय चव्हाण, रंगराव कणसे, राहुल पाटील, वैभव माळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. रोहित पाटील, पैलवान प्रमोद कणसे, महेश कणसे, प्रशांत पाटील यांनी संयोजन केले.

सुनील संपतराव कणसे यांनी प्रास्ताविक केले. प्रतापराव कणसे यांनी सूत्रसंचालन केले. व आभार मानले.

अधिकराव जगताप म्हणाले, काँग्रेसचे देशाच्या स्वातंत्र्यात फार मोठे योगदान आहे. ६० वर्षात देशाचा शाश्र्वत विकास याच पक्षाने केला. पण आज भाजपच्या काळात महागाई गगनाला भिडली आहे. योजना आणि महागाईचा समतोल राहिलेला नाही. पंडित नेहरू अकरा वर्षे तुरुंगात होते. तर इंदिरा गांधी आणि राजीव गांधींची हत्या झाली. पण भाजपच्या नेत्यांना कुठे खरचटलेले नाही.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close