लोकसभा निवडणुकांत सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अप्रत्यक्ष सहभाग होता : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : राजकीय संकटात सापडल्याने काँग्रेसचा हात सोडून भाजपवासी झालेले परंतु तिकडेही तशाच संकाटात सापडल्याने अखेर ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
त्यांच्या प्रवेशाने पवार-पाटील या घराण्याातील जवळपास ४० वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला. बारामती आणि इंदापूरमध्ये गेली दोन दशके छुपा संघर्ष असायचा. आघाडीत असूनही अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करायचे. परंतु आता हर्षवर्षन पाटील यांनीच हाती तुतारी घेतल्याने ज्येष्ठ नेते म्हणून पुणे जिल्ह्याचे नेतृत्व आपसुकच त्यांच्याकडे आले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्याबरोबरच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला पाटील घराण्यातील सदस्य देखील उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अप्रत्यक्ष सहभाग होता, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले. “सुप्रिया सुळे आमच्या भगिनी आहेत. आमची बहीण चार वेळा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या. तीन वेळा त्यांना जिंकविण्यात आमचा प्रत्यक्ष सहभाग राहिला. परंतु यंदाच्या वेळी त्यांना मताधिक्य देण्यात आमचा अप्रत्यक्ष सहभाग होता”, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. भाजपमध्ये राहूनही पर्यायाने महायुतीत भाग असूनही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी काम केले नाही, अशी अप्रत्यक्ष कबुलीच हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेताच दिली.
हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याकडे राज्यव्यापी नेते म्हणून पाहिले जायचे. काँग्रेसचे मुख्यमंत्री कुणीही असो हर्षवर्धन पाटील हे त्या मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळ असायचे. आघाडी सरकारमध्ये हर्षवर्धन यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देखील असायची. त्याच सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्याकडेही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असायच्या. परंतु काही ना काही कारणांवरून दोघांमध्ये संघर्ष व्हायचा. दोघा नेत्यांमध्ये अनेक कारणांवरून मतभेद व्हायचे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि बारामती हे पक्के शेजारचे तालुके. त्यामुळे जिल्ह्याचे नेतृत्व करण्यावरून अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात तीव्र स्पर्धा असायची.
दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांचे खच्चीकरण करण्याकरिता अजित पवार यांनी अनेकदा इंदापूरच्या स्थानिक नेतृत्वाला बळ दिले. दत्तात्रेय भरणे हे त्याचेच उदाहरण. हर्षवर्धन पाटील हे राजकीय पटावरून दूर व्हावेत, यासाठी त्यांचा तालुक्यातच पराभव करण्याकरिता अजित पवार यांनी भरणे यांना जाणूनबुजून वेळोवेळी शक्ती दिली. त्यामुळेच २०१४ आणि २०१९ साली भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला.