
कराड : उलट्या दिशेने आलेल्या दुचाकीस्वाराने एसटी चालकासह वाहकाला बेदम मारहाण करून जखमी केले आहे. येथील पादचारी पुलाजवळ शुक्रवारी ही घटना घडली. दरम्यान मारहाण करणारे दुचाकीवरील तिघे घटनास्थळावरून पसार झाले आहेत. तर जखमी चालक व वाहकास उपचारसाठी येथील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक कांही काळ विस्कळीत झाली होती.
चालक अर्जुन आत्माराम पवार (वय ४७ रा. तांबवे, ता. कराड) व वाहक दयानंद पंढरीनाथ गुरव (रा. सांगवड, ता. पाटण) अशी मारहाणीत जखमी झालेल्या चालक व वाहकाची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, चालक पवार हे कराड-गमेवाडी एस टी कराड बसस्थानकातून प्रवासी भरून गमेवाडीकडे जात होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर येथील पादचारी पुलाजवळील सातारा वळणावरून अरूंद रस्त्यावर आले असता समोरून उलट्या दिशेने दुचाकीवरून तिघेजण आडवे आले. उलट्या दिशेने येऊनही एसटी चालक पवार यांना एसटी मागे घेण्यास सांगत बाचाबाची झाली. तोपर्यंत एसटी च्या पाठिमागील बाजूस सातारा दिशेला जाणाऱ्या वाहनाची रांग लागली होती. बाचाबाची करतच दुचाकीवरील तिघांनी चालकाला एसटीतून खाली ओढून मारहाण करण्यास सुरवात केली. चालकाला मारहाण करत असताना वाहक गुरव हे भांडणात शिरले असता त्या तिघांनी त्यांनाही दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत चालक वाहक रक्तबंबाळ होऊन जखमी झाले. त्यांची अवस्था बघून ते दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाले. तोपर्यंत महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच डी.पी. जैनच कंपनीचेे कर्मचारी दस्तगीर आगा यांच्यासह देखभाल विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रूग्णवाहीका बोलवून जखमी चालक व वाहकांना उपचारासाठी येथील कृष्णा रूग्णालयात दाखल केले. रस्त्यावर असलेली बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती.