
कराड ःहवाल्याची रक्कम लुटणाऱ्या टोळीची पोलीस कोठडी मंगळवारी संपणार होती. त्याना आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या कोठडीत आणखी दोन दिवसाची वाढ केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी दिली.
सुलताना शकील सय्यद, अजमेर मोहम्मद मांजरेकर, नजर मोहम्मद आरीफ मुल्ला, करीम अजीज शेख, नजीर बालेखान मुल्ला (सर्व रा. कराड) ऋतुराज धनाजी खडंग, ऋषिकेश धनाजी खडंग, अक्षय अशोक शिंदे (तिघेही रा. तांबवे, ता. कराड) शैलेश शिवाजी घाडगे, अविनाश संजय घाडगे (दोघेही रा. निमसोड, ता. खटाव) अशी न्यायालयीन कोठडीत वाढ झालेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबईहून हुबळीला हवालाची रक्कम घेऊन निघालेल्या कारमधील तीन कोटींची रक्कम कार अडवून मलकापूर ढेबेवाडी फाटा येथे मागील आठवड्यात पहाटे लुटण्यात आली. या लूट प्रकरणातील दहा संशयितांना डीवायएसपी पथक व कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात अटक केली. सर्व संशयितांना दि. 22 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मंगळवारी मुदत संपली. सर्व संशयितांना पुन्हा मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या कोठडीत दोन दिवसाची वाढ केली आहे. पोलीस कोठडीत संशयितांकडे कसून चौकशी केली असता त्यामध्ये आणखी साडेचार लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आत्तापर्यंत दोन कोटी 93 लाख 84 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या दोन चारचाकी गाडी व दोन दुचाकीही पोलिसांनी या अगोदर जप्त केल्या होत्या. त्यामध्ये आणखी वाढ झाली असून आणखी एका चारचाकी गाडीचा समोवश झाला आहे. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला चाकू व स्टिकही पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच या प्रकरणातील मुख्य सुत्रधार फरार असून त्याचाही शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी सांगितले.