
कराड : 2014 च्या निवडणुकीआधी अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले. या आरोपांवरून आता अजित पवारांनी तत्कालिन गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिवंगत आर.आर.पाटील यांच्यावर निशाणा साधला.
आर.आर.पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या त्या फाईलवर माझी खुली चौकशी करण्यात यावी, असा शेरा मारला. आर.आर.पाटलांनी केसाने माझा गळा कापला, असा आरोप अजित पवारांनी केला.
अजित पवारांनी केलेल्या या आरोपांवर तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अजित पवार बोलले ते खरं आहे. मात्र त्यात माझा काय दोष आहे, याबाबत बोलले असते तर बरं झालं असतं. मी सिंचन प्रकरण असेल किंवा राज्य सहकारी बँक असेल यामध्ये राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेतले, त्याची शिक्षा मला भोगायला लागली, त्याची मला चिंता नाही. सिंचन घोटाळा 70 हजार कोटीचा होता का 42 हजार कोटींचा, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळमध्ये बोलले, त्यामुळे आता कुणाच्या शिक्कामोर्तबाची गरज नाही’, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.
मी श्वेतपत्रिका काढायला सांगितली होती, कधीही घोटाळा म्हटलं नव्हतं. सिंचनाच्या अहवालात 70 हजार कोटी खर्च केल्याचं होतं, मात्र सिंचनाची वाढ झाली नव्हती, त्यामुळे मी फक्त सत्यता तपासायला सिंचन खात्याला सांगितलं होतं. मला चौकशी करायची असती तर मी ऍन्टी करप्शनला सांगितली असती, पुन्हा चुका होऊ नयेत, असा माझा उद्देश होता, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
विदर्भ महामंडळाची चौकशी व्हावी, असा एक अहवाल खालून आला होता, तो अहवाल गृहमंत्र्यांना सादर करण्यात आला. त्यामुळे ऍन्टी करप्शनला चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबतची माहिती मला नंतर कळाली. सिंचन घोटाळ्याची चौकशी मी लावली नव्हती, मात्र माझा नाहक बळी घेतला गेला. अजित पवारांनी 2014 ला सरकार पाडलं आणि भाजप राजवटीची मुहूर्तमेढ रोवली, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.