काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतील : संजय शिरसाट

संभाजीनगर : शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेतील असं विधान केलंय. राज्यात मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
महायुतीच्या बैठका सुरू असून एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे महायुतीची बैठकही पुढे ढकलण्यात आलीय. आता शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी म्हटलं की, लवकरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर होईल. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुढच्या २४ तासात मोठा निर्णय घेतील.
एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद दिलं जाईल अशा चर्चा सुरू आहेत. याचं खंडण करताना शिरसाट यांनी म्हटलं की, एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार नाहीत. त्यांना राज्याच्या राजकारणात रस आहे.
महाराष्ट्रातील महायुतीचे तिन्ही पक्षाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटले. अमित शहा हेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार याचा निर्णय घेतील. मुख्यमंत्र्याचे नावही लवकरच स्पष्ट होईल. तर मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी २ डिसेंबरला होणार असल्याचंही शिरसाट यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार नाहीत. त्यांचा केंद्रापेक्षा राज्यातील राजकारणात जास्त रस असल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळगावी गेल्यानं महायुतीत आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. शिरसाट यांनी सांगितलं की, जेव्हा एकनाथ शिंदेंना वाटतं की त्यांना विचार करण्यासाठी वेळ हवाय तेव्हा ते गावी जातात. एकनाथ शिंदे जेव्हा मोठा निर्णय घेणार असतात तेव्हा ते गावी जातात. येत्या २४ तासात ते मोठा निर्णय घेतील असंही संजय शिरसाट म्हणाले.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि महायुतीच्या इतर नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली. या चर्चेत मुख्यमंत्रीपदासह मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
राज्यात २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. भाजप महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानं भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचंही स्पष्ट झालं. पण अद्याप मुख्यमंत्री कोण होणार आणि कधी होणार हे ठरलेलं नाही.