
कराड ः गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या, गणपती निघाले गावाला..; चैन पडेना आम्हाला… या जयघोशात ढोल ताशांच्या तालात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत शनिवारी अनंत चतुर्थी ला आपल्या लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. कराडसह मलकापूर परिसरातील गणेशभक्तांनी घरगुतीसह व सुमारे 195 हुन अधिक सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पांचे दिमाखदार विसर्जन झाले. कराडला 16 तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीने कराडकरांच्या डोळ्याचे अक्षरशः पारणे फेडले. येथील कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर गणेशभक्तांची मांदिआळी पाहायला मिळाली. प्रशासनाने केलेल्या नेटक्या नियोजनामुळे यंदाचा गणेश उत्सव किरकोळ अपवाद वगळता निर्विघ्न पार पडला.
गणेशोत्सवात लहान मुलांसह नागरिक, महिला आणि जेष्ठ नागरिकांचाही उत्साह पहावयास मिळाला अनंतचतुर्दशीला शनिवार दि. 7 रोजी सकाळी 10 वाजता कार्वे नाका येथील उदयकला गणेश मंडळासह सार्वजनिक गणेशमंडळांच्या मिरवणुकांना प्रारंभ झाला. मिरवणुकीत पारंपारिक वाद्यांसह बँड, बँजो, डीजेच्या तालावर ठेका धरला होता. शहर आणि परिसरातील गणेशमुर्तींचे प्रीतिसंगमावर विसर्जन झाले. दुपारपर्यंत केवळ 53 सार्वजनिक गणेश मंडळांच्या मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. अनेक मंडळांच्या गणेशमुर्तींच्या विसर्जन मिरवणुका दुपारनंतर सुरू झाल्या. दुपारी घरगुती गणेश विसर्जनासह शहरातील अन्य संस्थांच्या गणपतींचे विर्सजन झाले.
रात्री दहापर्यंत सुमारे शंभराहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन झाले. प्रचंड उत्साहात व गणेशाच्या जयघोषात सुरू असलेली गणेश विसर्जन मिरवणुकीला रात्री बारा वाजताही मिरवणूक मार्गासह चावडी चौकासह कृष्णा घाट परिसरात प्रचंड गर्दी होती. बारा वाजता प्रशासनाच्या नियमानुसार वाद्य बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्येक गणेश मंडळ आपली गणेशमूर्ती कृष्णा घाटाकडे मोरया.. मोरया चा जयघोष करीत रवाना होत होत्या. रात्री बारा वाजता कृष्णा घाटावर सुमारे 37 गणेश मूर्ती विसर्जनासाठी दाखल झाल्या होत्या. गणेश मंडळ आपल्या मूर्ती नदीपात्रात विसर्जित करीत होते. रात्री बारा वाजता 132 हून जास्त गणेश मंडाळांच्या मूर्तीं विसर्जन झाले होते. त्यानंतर सुमारे 50 गणेश मंडळे चावडी चौकातून पुढे गेली. सर्वात शेवटी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वाठार येथील हनुमान गणेश मंडळाचा गणपती चावडी चौकातून विसर्जन स्थळाकडे रवाना झाला. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सर्व गणेश मूर्तींचे निर्विघ्न पणे विसर्जन झाले.
विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळांनी मिरवणुकीत चित्ररथ, देखावे सादर केले. पालिका प्रशासनाने कृत्रिम जलकुंडासह निर्माल्यासाठी ठिकठिकाणी कुंडांची सोय केल्याने कृष्णा नदीपात्रातील पाण्याचे प्रदूषण टाळण्यात यश आले. जमा होणारे निर्माल्य नेण्यासाठी पालिकेने ट्रॅक्टर सज्ज ठेवले होते. तसेच पालिकेचे कर्मचारी ही गणेश मंडळातील निर्मल्य मागून घेत पालिकेच्या कुंडात जमा करत होते. पर्यावरण गणेशोत्वासाठी मुर्ती पालिकेच्या कुंडात विसर्जित करण्याच्या पालिका व एन्व्हायरो क्लबच्या आवाहनाला गणेशभक्तांनी चांगला प्रतिसाद दिला. अनेक मंडळांनी मिरवणुकीच्या वाहनांवर आकर्षक सजावट केली होती. चावडी चौक येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांच्या स्वागतासाठी नगरपालिकेने, गणराया समितीने स्वागत कक्ष उभारला होता. विसर्जनासाठी कृष्णा घाटाकडे जाणाऱ्या प्रत्येक मंडळाचे नगरपालिकेच्या वतीने श्रीफल दवून स्वागत केले जात होते. माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह माजी नगरसेवक व विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत कक्षात हजेरी लावली.
मिरवणुका निर्विघ्नपणे पार पडाव्यात यासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर या कराडमध्ये तळ ठोकुन होत्या. तसेच पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्यासह पोलीस, दंगा काबू पथक, एस आर पी जवान, होमगार्ड व पोलीस मित्र हे मिरवणुकीवर लक्ष ठेवून होते. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांची टीम मिरवणुक मार्गसह अंतर्गत रस्त्यांवर आलेल्या मंडळांवर लक्ष ठेवून होती. प्रीतीसंगमावर विसर्जन ठिकाणी बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. घाटावर मोठ्या प्रमाणात लाईटची सोय केल्यामुळे गणेशभक्तांना नदीपात्रात मूर्ती नेण्यास अडचणी आल्या नाहीत. शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्तद्वारे पोलिसांकडून शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यावर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते.
रणजितनाना पाटील यांच्यातर्फे महाप्रसाद
मिरवणूक मार्गावर विविध संस्था, संघटनांनी बंदोबस्तावरील पोलिसांसाठी तसेच मिरवणूक पहायला आलेल्या गणेश भक्तांसाठी अल्पोपहार, पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. सामाजिक कार्यकर्ते रणजित पाटील मित्र मंडळाच्यावतीने कृष्णाबाई घाटावर गणेशभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. गेली दहा वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे.
वाहतुकीचे चोख नियोजन
कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेने केलेल्या वाहतुकीच्या चोख नियोजनामुळे कोठेही वाहतूक कोंडी झाली नाही. घाटावर मोठ्या प्रमाणात लाईटची सोय केल्यामुळे गणेशभक्तांना नदीपात्रात मूर्ती नेण्यास अडचणी आल्या नाहीत. शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्तद्वारे पोलिसांकडून शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यावर बारीक लक्ष ठेवण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत सुमारे 195 सार्वजनिक मंडळे आणि सुमारे 19 हजार घरगुती गणेशमूर्तींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.