
कराड : हप्त्याची मागणी करीत वडापाव व्यावसायीकाला लोखंडी झाऱ्याने मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्याकडील तेराशे रुपये जबरदस्तीने काढून घेण्यात आले. शहरातील भाजी मंडईत ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात मामासह भाच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र दन्नू राठोड (रा. गुरुवार पेठ, कराड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. अक्षय राजेंद्र रिठे व संतोष भोसले (दोघेही रा. बुधवार पेठ, कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील भाजी मंडईत राजेंद्र राठोड यांचा वडापावचा हातगाडा आहे. या गाड्यावर राजेंद्र राठोड व त्यांचा मुलगा राहुल हे दोघेजण व्यवसाय करीत असतात. गत सहा ते सात महिन्यांपासून अक्षय रिठे व त्याचा मामा संतोष भोसले हे दोघेजण राठोड यांच्या हातगाड्यावर येऊन हप्त्याची मागणी करीत होते. दर महिन्याला हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी दमदाटी ते करीत होते. तसेच गाड्यावरचे भजी आणि वडापाव उचलून तेथून निघून जायचे. मंगळवारी, दि. ५ सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास राजेंद्र राठोड आणि त्यांचा मुलगा राहुल हे दोघेजण गाड्यावर व्यवसाय करीत असताना अक्षय रिठे आणि संतोष भोसले हे दोघेजण गाड्यावर आले. त्यांनी राठोड यांच्याकडे हप्त्याची मागणी केली. त्यावेळी राठोड यांनी त्या दोघांना विनंती करीत आम्हाला त्रास देऊ नका, असे सांगितले. मात्र, तरीही आम्ही संध्याकाळी येतो. पैसे तयार ठेवा, अशी दमदाटी करून ते दोघे तेथून निघून गेले. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुन्हा दोघेजण तेथे आले. त्यांनी पैशाची मागणी करीत हातगाड्यावरील लोखंडी झाऱ्याने राजेंद्र राठोड व राहुल यांना बेदम मारहाण केली. तसेच गल्ल्यामधील तेराशे रुपये काढून घेऊन ते तेथून निघून गेले.
याबाबत राजेंद्र राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार हसीना मुजावर तपास करीत आहेत.