महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण? भाजपकडून आज केली जाणार घोषणा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये महायुतीला चांगले यश मिळाले असून, बहुमताचा आकडाही पार केला आहे. त्यानुसार, आता महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचाली वाढल्या आहेत.
5 डिसेंबरला नवीन सरकार स्थापन होणार आहे. तत्पूर्वी आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याची घोषणा भाजपच्या वरिष्ठांकडून केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासूनची ताणली गेलेली उत्सुकता आज संपणार आहे.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीतील नेत्यांमधील पद आणि पदावरून संघर्ष मंगळवारीही सुरूच होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी सायंकाळी उशिरा एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. अडीच तास चाललेल्या या बैठकीनंतर आता सर्व काही ठीक असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याची घोषणा बुधवारी होण्याची शक्यता आहे. भाजपचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन मुंबईत पोहोचले आहेत.
दरम्यान, आज सकाळी 11 वाजता होणाऱ्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची नेतेपदी निवड होणार हे निश्चित मानले जात आहे. यानंतर त्यांची महायुतीच्या नेतेपदी निवड होणार आहे.
दुसरीकडे, शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या प्रतिष्ठेनुसार पद देण्याची मागणी केली. शिंदे यांना पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री करावे, अशी महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाबाबत भाजप जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, असे आमच्या नेत्याने म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत आम्हाला मुख्यमंत्रिपद मिळाले असते तर त्याचे परिणाम चांगले झाले असते. आता मुख्यमंत्रिपद मिळणार नसल्याने शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद तसेच गृहमंत्रिपद मिळावे, अशी आमच्या सर्व आमदारांची इच्छा आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वृत्ती पाहता महायुतीच्या बैठकीबाबत सस्पेंस आहे. शिंदे महायुती सरकारमध्ये सहभागी होणार की बाहेरून पाठिबा देणार? याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, भाजप अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापनेकडे वाटचाल करत आहे. त्याचबरोबर सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय त्यांनी शिंदे यांच्यावर सोडला आहे.