राज्यसातारा

प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार

कराड ः विजय दिवस समारोह समितीच्यावतीने देण्यात येणारा जीवन गौरव यशवंत पुरस्कार प्रा. डॉ. बाबुराव गुरव यांना कृष्णा विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, कर्नल संभाजीराव पाटील, सौ. संध्या पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ब्रिगेडीयर जॉयदिप मुखर्जी, कर्नल समीर कुलकर्णी, लेफ्टनंट कर्नल मंदार जाधव, पालिकेच्या उपमुख्याधिकारी वर्षा बडदरे, कर्नल काटेकर, ॲड. संभाजीराव मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कराड नगरपालिकेच्यावतीने उपमुख्याधिकारी वर्षा बडदरे व मान्यवरांच्या हस्ते ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. वीरपत्नी म्हणून रेठरे खुर्द येथील श्रीमती सुनिता कळसे, आदर्श माता म्हणून आबईचीवाडी येथील श्रीमती अंजना येडगे, आदर्श विद्यार्थी म्हणून यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजची सानिका यादव, सरस्वती विद्यालयाचा अभिनव कोळी, टिळक हायस्कुलचा हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. गुरव म्हणाले, ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर मला काही काळ काम करायची संधी मिळाली. त्यांच्या नावाने विजय दिवस समारोह समितीने दिलेला पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. या पुरस्काराच्या जबाबदारीची भान ठेवुन यापुढे त्या पुरस्काराला साजेसे काम मी निश्चित करेन. कुलपती डॉ. भोसले म्हणाले, विजय दिवस समारोह समितीने सैन्याबद्दल समाजात आदरभाव निर्माण करण्याचे मोठे काम केले आहे. कृष्णा विद्यापीठाच्या माध्यमातून दरवर्षी सैन्यदलातील मेडीकल युनिटमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण देण्याचे काम सामाजिक बांधिलकीतून केले जाते. विजय दिवस समारोह समितीने कर्नल संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून सर्व शाळांत एनसीसी प्रशिक्षण सक्तीचे करण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करावेत. माजी राज्यपाल श्री. पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्याला वेगळी परंपरा आहे. कऱ्हाडला कर्नल संभाजी पाटील यांच्यामुळे गेल्या २६ वर्षापासून विजय दिवस मोठ्या दिमाखात साजरा होतो. या विजयी दिवसाला सैन्यदलातील अनेक अधिकारी, जवान येतात. त्यांच्या माध्यमातून अनेक तरुणांनी प्रेरणा घेऊन सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. हे या विजय दिवसाचे यश आहे.
कर्नल संभाजीराव पाटील यांनी विजय दिवस सुरु करण्यामागची भूमिका स्पष्ट करून यापुढेही ही परंपरा कायम राहील ही ग्वाही दिली. ॲड.संभाजीराव मोहिते यांनी प्रास्ताविक केले. ॲड. नितीन भंडारे यांनी आभार मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close