
कराड : वाठार (ता.कराड) गावच्या हद्दीत कोल्हापूर-सातारा महामार्गावर पिस्तुल विक्रीकरिता आलेल्या दोन युवकांकडून 2 देशी बनावटीची पिस्टूल, 2 मॅक्झीन, 2 जिवंत काडतुसे व एक मोटरसायकल असा 1 लाख 95 हजार 500 रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. सातारा स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी हि कारवाई केली. या प्रकरणी सुरज गणपत चव्हाण (वय 20) रा. रेठरे बु. ता.कराड व ओंकार युवराज थोरात (वय 25) रा. ओंड ता.कराड या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधिक्षक समिर शेख व अपर पोलिस अधिक्षक वैशाली कडुकर यांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची गोपनीय माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करण्याच्या सुचना पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांना दिल्या होत्या. गुरूवर दि. 19 रोजी पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांना वाठार गावच्या हद्दीत कोल्हापूर-सातारा महामार्गालगतच्या सेवा रस्यावर नवनाथ महाराज यांच्या मठासमोर रोडवर दोन इसम देशी बानावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुसे विक्रीसाठी येणार असल्याची गोपनिय माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार अरूण देवकर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित फर्णे यांच्या यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून सापळा रचुन कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
त्यानुसार राहित फर्णे यांच्या पथकाने कराड तालुका पोलिसांसमवेत नवनाथ महाराज यांच्या मठासमोरील रस्त्यावर सापळा लावला. त्यावेळी मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना दोन इसम मोरटसायकलवरून येताना दिसले. स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या इसमांना शिताफीने पकडून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन देशी बनावटीची पिस्तुल, दोन मॅक्झीन, दोन जिवंत काडतुसे व मोटरसायकल, दोन मोबाईल असा 1 लाख 95 हजार 500 रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. दोघांनाही पोलिसांनी अटक केली. पुढील तपास पोलीस करित आहेत.