
कराड ः कराड शहर व परिसरातील दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने ताब्यात घेतला. त्याच्याकडून सुमारे अडीच लाखाच्या 10 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गत काही महिन्यात कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढलेले होते. याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना चोरट्यास ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कराड शहर पोलिस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे भापकर व त्यांच्या पथकाने विविध ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदाराच्या मदतीने मलकापूर येथून एका अल्पवयीन चोरट्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने कराड शहर व परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबूली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे अडीच लाख रूपये किमतीच्या 10 दुचाकी जप्त केल्या.
सदरची कामगिरी डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर, पोलीस उपनिरीक्षक आंदेलवार, पोलीस हवालदार अनिल स्वामी, धिरज कोरडे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, मोहसीन मोमीन, दिग्विजय सांडगे, हर्षल सुखदेव, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ यांनी केली.